जन्मदाखल्याआधीच नवजात बाळाला दिले जाणार आधारकार्ड

आधार कार्ड अॅथॉरिटी युआयडीएआय लवकरच जन्म होताच हॉस्पिटल मध्येच नवजात बाळाला आधार कार्ड देण्याची सुविधा सुरु करत आहे. त्यामुळे जन्मदाखला मिळण्यापूर्वीच बाळाला आधार कार्ड उपलब्ध होणार आहे. सध्या जन्मदाखला मिळण्यास १ महिन्याचा अवधी लागतो. युआयडीएआयचे सीईओ सौरभ गर्ग या संदर्भात माहिती देताना म्हणाले, नवजात शिशु आधार नंबर योजनेसाठी बर्थ रजिस्ट्रारसह टायअप केला गेला असून देशात सध्या ९९.७ टक्के लोकसंख्येला आधार कार्ड दिली गेली आहेत. १३१ कोटी जनतेने आधार कार्ड साठी एनरोल केले आहे. आता नवजात बाळाला आधार कार्ड देण्याचा उपक्रम हाती घेतला गेला आहे.

देशात दरवर्षी सरासरी दोन ते अडीच कोटी बालके जन्माला येतात. जन्माच्यावेळीच त्यांचा फोटो काढून त्यांना आधार कार्ड दिले जाणार आहे. ५ वर्षाखालील मुलांचे बायोमेट्रिक केले जात नाही. पण नवजात बाळाच्या आई किंवा वडिलांपैकी एकाला या आधारकार्डशी जोडले जाईल. ५ वर्षानंतर बायोमेट्रिक केले जाईल. देशात सर्व नागरिकांना आधार कार्ड देण्याचा प्रयत्न सुरु आहे. गतवर्षी दुर्गम भागात १० हजार शिबिरे त्यासाठी भरविली गेली आणि ३० लाख लोकांना आधार कार्ड दिले गेले.

२०१० मध्ये पहिला आधारकार्ड नंबर दिला गेला होता. सध्या दरवर्षी १० कोटी नागरिक पत्ता बदल, मोबाईल नंबर असे अपडेट करत आहेत. १४० कोटी बँक शाखात १२० कोटी आधार कार्ड जोडली गेली आहेत. आता मतदार कार्डबरोबर सुद्धा आधार जोडण्यास केंद्रीय मंत्रीमंडळाने नुकतीच मंजुरी दिली आहे. त्यामुळे बनावट मतदानावर नियंत्रण आणता येणार आहे. निवडणुक आयोगाच्या सुचनेनुसारच केंद्र सरकार याची अंमलबजावणी करत आहे.