आधार कार्ड योजनेमुळे सरकारची २.२५ लाख कोटींची बचत

आधार कार्ड मुळे बनावट लाभार्थी सिस्टीम बाहेर गेल्याने सरकारची २.२५ लाख कोटीं रुपयांची बचत झाल्याचे युआयडीएआयचे सीईओ सौरभ गर्ग यांनी जाहीर केले आहे. ते म्हणाले, केंद्र सरकारच्या ३०० आणि राज्य सरकारच्या ४०० योजना आधार बरोबर जोडल्या गेल्या आहेत. त्यामुळे प्रत्यक्ष लाभार्थीना योजनेचा लाभ मिळाला आहेच पण फक्त केंद्र सरकारी योजनातून २.२५ लाख कोटींची बचत झाली आहे. राज्य सरकारी योजना यात जोडल्या गेल्या तर हा आकडा आणखी वाढणार आहे.

कोविड १९ साथी दरम्यान आधारच्या मदतीनेच लाभार्थींना वेळच्या वेळी पैसे पाठविणे शक्य झाले. लॉकडाऊन काळात बँकेत न जाताही आधारमुळे ही सुविधा सर्वसामान्य माणसाच्या जीवनात उपलब्ध होऊ शकली. आधार कार्ड योजना सुरु करून आता १० वर्षे लोटली आहेत आणि त्या काळात मोठा टप्पा गाठला गेला आहे. येत्या ३-४ वर्षात प्राथमिक निवासी सुविधा अधिक प्रमाणावर देण्याचा प्रयत्न आहे. यामुळे लोक घरातूनच संगणकावरून आधार अपडेट करू शकतील. पॅन, मोबाईल सिमकार्ड, रेशन, बँक खात्यात आधार जोडणी वेगाने केली जात असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.