देशातील शोध पत्रकारिता नामशेष होत आहे; सरन्यायाधीश एन. व्ही. रमण


नवी दिल्ली – देशाचे सरन्यायाधीश एन. व्ही. रमण यांनी सद्यस्थितीत भारतातील माध्यमांमध्ये शोध पत्रकारिता गायब होत असून आजूबाजूला सर्वकाही आलेबल असल्याचे दाखवले जात असल्याचे मत व्यक्त केले. बुधवारी (१५ डिसेंबर) ते पत्रकार सुधाकर रेड्डी लिखित ‘ब्लड सँडर्स’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात बोलत होते. त्यांनी यावेळी त्यांची पहिली नोकरी ही पत्रकारितेची असल्याचे नमूद केले आणि त्यांच्या तरूणपणातील वर्तमानपत्रात वेगवेगळे घोटाळे उघड करणाऱ्या रिपोर्टिंगविषयी आपली मते मांडली.

यावेळी सरन्यायाधीश रमण म्हणाले, पत्रकाराची ज्याची पहिली नोकरी होती, असा व्यक्ती म्हणून मी आजच्या दिवशी माध्यमांवर काही विचार मांडण्याचे स्वातंत्र्य घेणार आहे. भूतकाळात शोध पत्रकारितेतून वेगवेगळे घोटाळे उघड व्हायचे, गैरव्यवहार समोर यायचे आणि त्यामुळे देशभरात पडसाद पडलेले आम्ही पाहिले आहेत. पण, सध्याच्या काळात एखाद दुसरा अपवाद सोडता अशा ताकदीची शोध पत्रकारिता पाहायला मिळत नाही. भारतात शोध पत्रकारिता नामशेष होत असल्याचे दिसत आहे.

जेव्हा आम्ही तरूण होतो, तेव्हा आम्हाला वर्तमानपत्रांमध्ये घोटाळे समोर आलेले वाचण्याची उत्सुकता असायची. तेव्हा वर्तमानपत्रांनी आम्हाला कधीही निराश केले नाही. पण, सध्याच्या काळात आपल्या अवतीभवती सर्वकाही आलबेल असल्याचे दाखवले जाते. त्यामुळे या विषयावर तुम्ही स्वतःच तुमची मते बनवावी, असे सांगून मी याबाबतचा निर्णय तुमच्यावर सोपवतो, असेही सरन्यायाधीश रमण यांनी नमूद केले. सरन्यायाधीश रमण यांनी आपल्या करिअरची सुरुवात तेलगू वृत्तपत्र ईनाडूमधून पत्रकार म्हणून केली होती.

सरन्यायाधीश रमण हे मूळचे आंध्र प्रदेशमधील असून ते आणि या पुस्तकाचे लेखक सुधाकर रेड्डी आंध्रमधील अगदी जवळजवळच्या गावचे रहिवासी होते. रमण यांनी यावेळी आपल्या मूळ गावाच्या आठवणींवर बोलताना गावाकडे जाण्याची इच्छा असल्याचे बोलून दाखवले. तसेच लवकरच त्याबाबत नियोजन करणार असल्याचे त्यांनी नमूद केले.