धक्कादायक! मध्य प्रदेशात तब्बल ४४ लाखांची बोली लावत विकले गेले सरपंचपद


भोपाळ – सरपंचपदासाठी निवडणुक न घेता बोली लावत पद विकण्याचा धक्कादायक प्रकार मध्य प्रदेशमधून समोर आला आहे. सर्वाधिक बोली लावणाऱ्याला मध्य प्रदेशातील एका गावातील रहिवाशांनी सरपंचपद विकले आहे. हे पद गावातील इतर चार जणांना पराभूत करत एका व्यक्तीने जिंकले आहे. तब्बल ४४ लाख रुपयांची बोली लावत या व्यक्तीने सरपंचपद जिंकले. ४४ लाखांची अंतिम बोली लावल्यानंतर त्या व्यक्तीची एकमताने सरपंचपदासाठी नेमणूक करण्यात आली. दुसरीकडे स्थानिक अधिकाऱ्यांनी या पदाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासह योग्य निवडणूक प्रक्रिया पाळावी लागणार असल्याचे सांगितले.

या बोली लावण्याच्या प्रक्रियेला अशोकनगर जिल्ह्यातील भटौली ग्रामपंचायतीच्या ग्रामस्थांनी नवीन प्रणाली म्हटले आहे आणि या पदासाठी जे इच्छुक आहेत, त्यांच्यामध्ये कोणताही वाद किंवा तणाव होणार नाही, याची खात्री केली जाईल, असेही त्यांनी म्हटले. या पद्धतीमुळे उमेदवार मते जिंकण्यासाठी दारू आणि पैसे वाटणार नसल्याचा दावा या ग्रामस्थांनी केला आहे.

सौभागसिंग यादव यांची मंदिरात झालेल्या खुल्या लिलावात एकमताने सरपंचपदी निवड झाली. २१ लाखांच्या मूळ किमतीने यावेळी बोली सुरू झाली आणि ४३ लाखांपर्यंत पोहोचली. त्यानंतर यादव यांनी ४४ लाखांची अंतिम बोली लावली. जिंकल्यानंतर ग्रामस्थांनी त्यांचे पुष्पहार घालून स्वागत केले व नवीन सरपंच म्हणून त्यांची घोषणा केली. राज्यातील आगामी पंचायत निवडणुकीत त्यांच्या विरोधात कोणीही उमेदवारी दाखल करणार नसल्याचाही निर्णयही यावेळी घेण्यात आला.

दरम्यान, जर ४४ लाख रुपये जमा करण्यात सौभाग यादव अयशस्वी झाले, तर त्यांच्यानंतर सर्वाधिक बोली ज्या उमेदवाराने लावली होती, त्याचा या पदासाठी विचार केला जाईल, असे ग्रामस्थांनी सांगितले. पण या प्रक्रियेला मान्यता दिली जाणार नसल्याचे स्थानिक अधिकाऱ्यांनी सांगितले. जो कोणी निवडणूक लढवतो त्याला फॉर्म भरावा लागेल. जर फक्त सरपंच पदासाठी फॉर्म आला आणि तो वैध ठरला, तर तो सरपंच निवडला जाईल. तो कोणीही असू शकतो, अगदी बोली लावणाराही, असे एका अधिकाऱ्याने एनडीटीव्हीला सांगितले.