रुपाली पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश


पुणे – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पुण्यातील फायरब्रँड नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी आज अधिकृतरित्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थित त्यांचा पक्ष प्रवेश झाला. यावेळी रुपाली ठोंबरे यांच्यासह लावण्या शिंदे, वंदना साळवी, मनीषा सरोदे, मनिषा कावेडीया, प्राजक्ता पाटील, प्रिया पाटील, निशा कोटा यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

तसेच मालेगावमध्येही राष्ट्रवादीमध्ये इनकमिंग झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मालेगाव शहराध्यक्ष असिफ शेख यांच्या पुढाकाराने भाजप, जनता दल, एमआयएम या पक्षांमधून अब्दुल माजीद चमडेवाले, अन्सारी अकील, शर्जील अन्सारी, बिलाल बिल्डर, अन्सारी नईम अहमद यांनी पक्ष प्रवेश केला. अन्सारी शोएब अहमद, सोहेल अख्तर, अबुझर अन्सारी, फरीद अहमद, दरगाही फन्वाद, दरगाही फहाद, अतुल सुर्यवंशी, मन्सूर अख्तर उस्मान गणी, रईस उस्मानी यांनीही राष्ट्रवादीचे घड्याळ हाती बांधले.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना रुपाली पाटील यांनी पत्र लिहून, आपण सर्व पदे सोडत असल्याचे सांगितले होते. रुपाली पाटील यांनी राज ठाकरे पुणे दौऱ्यावर असतानाच मनसेला रामराम ठोकला. मनसेसाठी हा मोठा झटका मानला जात आहे. मुंबईत काही कामानिमित्त मंगळवारी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि युवा सेना नेते वरूण सरदेसाई यांची भेट झाली होती. त्यामुळे रुपाली पाटील नेमके कोणत्या पेक्षात प्रवेश करणार याबाबत उत्सुकता लागली होती. अखेर आज, त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. पार्थ पवार यांनी ट्वीट करत याबाबतची माहिती दिली.


पार्थ पवार आपल्या ट्वीटमध्ये म्हणतात की, Adv. रुपाली पाटील ठोंबरे यांचे राष्ट्रवादी परिवारात स्वागत आहे. पुण्यातील तरुण आणि महिलांशी संबंधित प्रश्न हिरीरीने मांडण्यात त्या कधीच मागे हटल्या नाहीत. मला पूर्ण विश्वास आहे की त्या यापुढेही तितक्याच तीव्रतेने आणि सचोटीने काम करत राहतील.