नवाब मलिकांचा मोदी सरकारवर मुलींचे लग्नाचे वय २१ करण्यावरून निशाणा!


मुंबई – आपल्या देशात सध्या लग्नासाठी मुलींचे किमान वय १८ वर्षे, तर मुलांचे किमान वय २१ वर्षे असावे अशी अट आहे. पण, आता मुलींचे वय १८ वरून २१ करण्याचा विचार केंद्र सरकार गांभीर्याने करत असल्याचे सांगितले जात आहे. सध्या सुरू असलेल्या संसदेच्या हिवाळी अधिवेशनामध्ये यासंदर्भातील विधेयक आणण्याची देखील तयारी केंद्र सरकारने चालवली असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान या मुद्द्यावरून संमिश्र प्रतिक्रिया येत असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी या मुद्द्यावरून केंद्र सरकारवर खोचक शब्दांत निशाणा साधला आहे. तसेच, अशा निर्णयाला विरोध दर्शवला आहे.

स्त्री-पुरुषांच्या वयामध्ये लग्नासाठी अंतर असायला हवे, असे मत नवाब मलिक यांनी व्यक्त केले आहे. मला वाटत नाही की असे काही करण्याचा निर्णय झाला आहे. १८ वर्षांत मतदानाचा अधिकार आहे. १८ वर्षांत व्यक्तीला सज्ञान म्हणून घोषित केले जाते. महिलांचे लग्नासाठी वय २१ झाले, तर मग पुरुषांचे वय २५ केले जाईल का? पती-पत्नीमध्ये वयाचे अंतर असायला हवे, असे नवाब मलिक म्हणाले.

दरम्यान, विवाहाबाबत निर्णय घेण्याचा देशातील प्रत्येक सज्ञान व्यक्तीला अधिकार असल्याचे नवाब मलिक यांनी यावेळी नमूद केले. आम्हाला वाटते की महिलांचे वय २१ झाले, तर मग पुरुषांचे वय २५ केले जाईल का? आम्हाला वाटते की, जो कुणी सज्ञान व्यक्ती आहे, त्याला आपल्या विवाहाबाबत निर्णय घेण्याचा अधिकार आहे. त्याच्या परवानगीशिवाय कोणताही विवाह देशात होऊ शकत नाही. असे तर नाही ना, की लोकांनी लग्नच करू नये, या दिशेने मोदी सरकार देशाला घेऊन जायचा प्रयत्न करत आहे का? कारण आपला देश अविवाहित लोकांच्या हातात आहे आणि लग्नाविषयी ते गंभीर नसल्याचे ते म्हणाले.

आम्हाला वाटते की जनतेला काय हवे आहे ते महत्त्वाचे आहे. अविवाहीत मुख्यमंत्री किंवा पंतप्रधानांना काय वाटते, हे महत्त्वाचं नाही. सज्ञान व्यक्तीला मतदान करण्याचा, पंतप्रधान निवडण्याचा अधिकार आहे, त्याला आपल्या लग्नाबाबत निर्णय घेण्याचा अधिकार असायला हवा, असे देखील नवाब मलिक म्हणाले.

केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक बुधवारी पार पडली. या बैठकीमध्ये मुलींचे लग्नाचे वय १८ वर्षांवरून २१ वर्षे करण्यावर चर्चा झाली. त्यानंतर यासंदर्भातील विधेयक यंदाच्या हिवाळी अधिवेशनामध्ये मांडण्याचा निर्णय देखील झाल्याचे बोलले जात आहे. सरकारने यासंदर्भात नेमलेल्या टास्क फोर्सने मुलींचे लग्नाचे वय १८ वरून २१ करण्याची शिफारस केली आहे. या अहवालानंतर मंत्रिमंडळात त्यावर चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे.