राष्ट्रीय नेमबाज कोनिका लायकची गळफास लावून आत्महत्या


नवी दिल्ली – राष्ट्रीय रायफल नेमबाजपटू कोनिका लायक हिने आत्महत्या केली आहे. कोनिकाला तिच्या खेळासाठी प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता सोनू सूदने रायफल भेट दिली होती. २६ वर्षीय कोनिका लायक झारखंडच्या धनबादची रहिवासी होती. या नवोदित खेळाडूच्या निधनाने क्रीडा जगताला धक्का बसला आहे. माजी ऑलिम्पियन आणि अर्जुन पुरस्कार विजेते जयदीप कर्माकर यांच्यासोबत कोनिका कोलकाता येथे प्रशिक्षण घेत होती, असे सांगण्यात येत आहे. कोनिकाने वसतिगृहाच्या खोलीत गळफास लावून आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे.

पूर्वी कोनिका लायक जुन्या रायफल वापरायची. तिच्या प्रशिक्षकांच्या किंवा मित्रांच्या त्या रायफली असायच्या. राज्य आणि राष्ट्रीय स्पर्धांमध्ये ती त्याच जुन्या रायफलने शूटिंग करत असे. यानंतर, जेव्हा प्रसिद्ध अभिनेता सोनू सूदला तिच्याबद्दल माहिती मिळाली, तेव्हा त्याने या नवोदित खेळाडूला मार्च महिन्यात एक नवीन रायफल भेट दिली. जेणेकरुन ती तिच्यातील कलागुणांना आणखी वाव देऊ शकेल.

कोनिकाला उत्तम प्रशिक्षणासाठी जयदीप कर्माकर यांनी अकादमीत नेले होते. अकादमी व्यवस्थापनाने ‘ट्रिब्यून’शी संवाद साधताना सांगितले की, गेल्या १० दिवसांपासून कोनिका प्रशिक्षणासाठी फार कमी वेळा सत्रांमध्ये येत असे. जयदीप कर्माकर यांनी, हे खूपच धक्कादायक आहे. पूर्वी ती तिचा व्यायाम व्यवस्थित करत होती. पण काही दिवसांनी ती प्रशिक्षण सत्रात अनियमितपणे येत होती. यामागे काय कारण आहे, हे मला माहीत नसल्याचे म्हटले. कर्माकर यांनी सांगितले की लवकरच ती लग्न करणार होती. काय झाले आणि कोणत्या दबावाखाली तिने हे पाऊल उचलले, हे मला खरोखरच माहीत नाही, असे कर्माकर म्हणाले.