एसटी कर्मचाऱ्यांसोबतच, आम्ही जनतेशी देखील बांधील; संपकऱ्यांना अनिल परब यांचा इशारा


रत्नागिरी – अद्यापही एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरूच असून मेस्मातंर्गत कर्मचाऱ्यांवर कारवाई केली जाणार असल्याचा इशारा परिवहनमंत्री अनिल परब यांनी दिला आहे. पण, कर्मचारी आपल्या विलिनीकरणाच्या मागणीवर ठाम आहेत. याबाबत परिवहन मंत्री अनिल परब यांना विचारले असता ते म्हणाले, सरकार हातावर हात ठेवून गप्प बसणार नाही. मेस्मा लावण्याबाबत उद्याच्या बैठकीनंतर निर्णय होऊ शकतो. तसेच, याबाबत वेगवेगळ्या पर्यायांवर विचार सुरू असून जसे आमचे कर्मचाऱ्यांशी दायित्व आहे तसेच जनतेशी देखील असल्याचे अनिल परब यांनी म्हटले रत्नागिरी येथे पत्रकारांशी संवाद साधताना म्हटले आहे.

गुणरत्न सदावर्ते यांच्याबाबत देखील यावेळी त्यांना प्रश्न विचारला गेला. त्यावर बोलताना त्यांनी एसटी कर्मचाऱ्यांची दिशाभूल केली जात असल्याचे म्हणत अप्रत्यक्षरित्या सदावर्ते यांना लक्ष्य केले. मी सध्या रत्नागिरी दौऱ्यावर असल्यामुळे पुढील होणाऱ्या कारवाईबाबत मुंबईला गेल्यानंतर उद्या अर्थात शुक्रवारी निर्णय घेतला जाणार असल्याचे यावेळी परब यांनी म्हटले आहे.

त्याचबरोबर किरीट सोमय्या यांच्यावर विचारलेल्या प्रश्नावर देखील यावेळी त्यांनी आक्रमकपणे उत्तर दिले. किरीट सोमय्यांना उत्तर देण्यास मी बाधिल नसून संबंधित यंत्रणांना ते दिले आहे. सोमय्यांनी मुख्यमंत्री, महाविकास आघाडी आणि माझी बदनामी करण्याचा धंदा सुरू केला आहे याबाबत मी न्यायालयात दावा दाखल केला आहे. त्यामुळे किरीट सोमय्यांना माझी माफी तरी मागावी लागेल किंवा 100 कोटी तरी द्यावे लागतील, असे अनिल परब यांनी म्हटले आहे.

तसेच, सरकार ओबीसी समाजावर अन्याय होऊ देणार नसून कॅबिनेटमध्ये निवडणुका पुढे ढकलण्याबाबत निर्णय झाल्याची प्रतिक्रिया देखील परब यांनी दिली. ओबीसी आरक्षण रद्द झाल्याबाबत विचारलेल्या प्रश्नाला त्यांनी हे उत्तर दिले आहे.