शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी जाहिर केले १०वी आणि १२वीच्या परीक्षांचे वेळापत्रक


मुंबई – जगभरात गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाचे संकट थैमान घालत आहे. विद्यार्थ्यांचे या संकट काळात मोठ्या प्रमाणावर शैक्षणिक नुकसान देखील झाले. अनेक अभ्यासक्रमांच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या. अनेक वर्ग ऑनलाईन झाले. आत्ता महाराष्ट्रात कुठे शाळा काही प्रमाणात सुरू होत असल्याचे दिसत आहे. या पार्श्वभूमीवर किमान पुढील वर्षी तरी १०वी आणि १२वीच्या बोर्डाच्या परीक्षा होणार का? आणि होणार तर कधी आणि कशा होणार? याविषयी चर्चा सुरू झाली होती. पण, या परीक्षांचा मुहूर्त आता ठरला आहे. राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी यासंदर्भात एका व्हिडीओच्या माध्यमातून घोषणा केली आहे.

वर्षा गायकवाड यांनी केलेल्या धोषणेनुसार, १२वीची लेखी परीक्षा पुढील वर्षी अर्थात २०२२ साली ४ मार्च रोजी होणार असून १५ मार्चपासून १०वीची लेखी परीक्षा सुरू होणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना आता त्यांच्या अभ्यासाचे आणि शाळांना त्यांच्या अभ्यासक्रमाचे नियोजन करणे शक्य होणार आहे.

आपण ओमिक्रॉनबाबत मॉनिटरिंग करत आहोत. पण १०वी आणि १२वी ही विद्यार्थी आणि पालकांच्या दृष्टीने महत्त्वाची वर्ष असतात. या परीक्षा कधी होणार अशी विचारणा होत होती. त्यानुसार दहावी आणि बारावीच्या परीक्षांबाबत निर्णय घेण्यात आला आहे. १२वीची लेखी परीक्षा ४ मार्च ते ७ एप्रिल या कालावधीत होईल. तर १०वीची लेखी परीक्षा १५ मार्च ते १८ एप्रिल या कालावधीमध्ये होईल, अशी माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.


१४ फेब्रुवारी ते ३ मार्च दरम्यान १२वीच्या प्रात्याक्षिक आणि तोंडी परीक्षा तर २५ फेब्रुवारी ते १४ मार्च या कालावधीत १०वीच्या प्रात्याक्षिक आणि तोंडी परीक्षा होतील, असे वर्षा गायकवाड म्हणाल्या.


दरम्यान, कोरोना काळात परीक्षांचे स्वरूप आणि मूल्यमापनाच्या पद्धती यामध्ये बदल करण्यात आला होता. त्यासंदर्भात आता त्याविषयी काय पद्धत असेल, याची उत्सुकता विद्यार्थ्यांमध्ये होती. त्यावर देखील वर्षा गायकवाड यांनी माहिती दिली आहे. जशी मागील काळात ऑफलाईन परीक्षा होत होती, तशीच आता होणार आहे. पेपर पॅटर्न आणि मूल्यमापन देखील तशाच स्वरूपाचे असेल, असे देखील त्यांनी सांगितले.


त्याचबरोबर आपल्या ट्विटरवरून वर्षा गायकवाड यांनी १०वी आणि १२वीच्या परीक्षांचे निकाल कधी लागतील, याविषयी देखील माहिती दिली आहे. १२वीचा निकाल जून २०२२ च्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत तर १०वीचा निकाल जुलै २०२२ च्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत लावण्यात येईल, असं वर्षा गायकवाड यांनी सांगितले आहे.