काल दिवसभरात देशात 7974 कोरोनाबाधितांची नोंद, तर 343 रुग्णांचा मृत्यु


नवी दिल्ली – सध्या देशातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याचे चित्र पाहायला मिळत असले तरी, ओमिक्रॉन या कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने डोके हळूहळू वर काढायला सुरुवात केली आहे. दरम्यान कोरोनाच्या दैनंदिन बाधितांच्या आकडेवारीतही मोठी घट झाल्याचे पाहायला मिळत आहे. आरोग्य मंत्रालयाने नुकत्याच जारी केलेल्या आकडेवारीनुसार, काल दिवसभरात देशात 7,974 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर 343 रुग्णांनी आपला जीव गमावला आहे. ज्यात केरळामध्ये काल दिवसभरात कोरोनाच्या 4006 रुग्णांची आणि 125 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. या सर्वात दिलासादायक बाब म्हणजे, गेल्या 24 तासांत देशात 7,948 बाधित कोरोनामुक्त झाले आहेत.

कोरोना महामारीच्या सुरुवातीपासून आतापर्यंत एकूण तीन कोटी 47 लाख 18 हजार 602 नागरिकांना कोरोनाची लागण झाली होती. यापैकी 4 लाख 76 हजार 478 बाधितांचा मृत्यू झाला होता. महत्त्वाची बाब म्हणजे, आतापर्यंत 3 कोटी 41 लाख 54 हजार बाधित कोरोनामुक्त झाले आहेत. देशात कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या एक लाखांहून कमी झाली आहे. एकूण 87 हजार 245 रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत.

आता कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने देशाची धाकधुक वाढवली आहे. ओमिक्रॉनची लागण झालेल्या रुग्णांच्या आकडेवारीत झपाट्याने वाढ होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. महाराष्ट्र आणि केरळात काल दिवसभरात प्रत्येकी 4-4 रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तामिळनाडूमध्येही एक ओमिक्रॉनबाधित रुग्ण आढळून आला. दरम्यान, देशात सध्या ओमिक्रॉनची लागण झालेल्यांची संख्या 73 वर पोहोचली आहे.

दरम्यान काल दिवसभरात राज्यात 925 नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर 929 बाधित कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यात आतापर्यंत 64 लाख 94 हजार 617 बाधितांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्याचा रिकव्हरी रेट 97.72 टक्के आहे. तसेच कोरोना प्रादुर्भावापासून तिसऱ्यांदा मुंबईत काल कोरोनामुळे एकही मृत्यूची नोंद झालेली नाही. कोरोनाच्या प्रादुर्भावात पहिल्यांदाच मुंबईला एवढा मोठा दिलासा मिळत असल्याचे म्हटले, तर चुकीचे ठरणार नाही. लसीकरणाचा हा सकारात्मक परिणाम असल्याचे सांगितले जात आहे. तसेच, मुंबई महापालिका आणि प्रशासनाने परिस्थितीनुसार, वेळोवेळी राबवलेल्या उपाययोजनाही फायदेशीर ठरल्याचेही बोलले जात आहे. दरम्यान, जगाची धाकधुक वाढवणाऱ्या ओमिक्रॉनने मुंबईतही शिरकाव केला आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिका सज्ज झाली असून निर्बंधही लागू करण्यात आले आहेत.

मुंबई महापालिकेने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, काल दिवसभरात मुंबईत 238 बाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर 210 बाधित कोरोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंत 7,45,200 मुंबईकर कोरोनामुक्त झाले आहेत. अशातच बरे झालेल्या रुग्णांचा दर 97 टक्क्यांवर पोहोचला आहे. तर सध्या शहरात सक्रिय 1797 रुग्ण आहेत. मुंबईसाठी आणखी एक दिलासादायक बाब म्हणजे, मुंबईतील रुग्ण दुपटीचा कालावधी 2514 दिवसांवर पोहोचला आहे. तर काल मुंबईत एकाही कोरोना रुग्णाचा मृत्यू झालेला नाही.