वर्क फ्रॉम होम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना अॅपल देणार १००० डॉलर्सचा बोनस


वॉशिंग्टन – संपूर्ण जगावर ओढावलेले कोरोनाचे दुष्ट संकट संपेल की काय असे वाटत असतानाच कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटमुळे धास्ती वाढू लागली आहे. ओमिक्रॉन या नव्या व्हेरिएंटमुळे पुन्हा एकदा संकटाचे ढग दाटू लागले आहेत. त्यामुळे कार्यालये आणि शाळा सुरु करण्याबाबत सावध पवित्रा घेतला जात आहे. त्यातच आता अॅपल या कंपनीने कर्मचाऱ्यांना कार्यालयात येण्याची मुदत मागे घेतली आहे.

दरम्यान अॅपलकडून वर्क फ्रॉम होम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी १००० अमेरिकन डॉलर्सचा बोनस जाहीर करण्यात आला आहे. खरे तर, अॅपलचे सीईओ टिम कुक यांनी आधी सांगितले होते की, ऑक्टोबरमध्ये कर्मचाऱ्यांसाठी कार्यालय उघडले जातील. नंतर १ फेब्रुवारी २०२२ पर्यंत वाढविण्यात आला होता.

आठवडाभरापूर्वी कर्मचाऱ्यांना फेब्रुवारीपर्यंत कामावर येण्यास कंपनीने सांगितले होते. पण पुन्हा एकदा ही मुदत वाढवण्यात आली आहे. अद्याप पुढील तारीख ठरलेली नाही. कोरोनाचा उद्रेक पाहता अॅपलने तीन रिटेल स्टोअर्स देखील बंद केले आहेत. बंद करण्यात आलेले स्टोअर्स मियामी, मेरीलँड आणि ओटावा येथे आहेत. अॅपलने त्यांच्या यूएस स्टोअरमध्ये आता मास्क अनिवार्य केले आहे. यापूर्वी ग्राहकांसाठी मास्क घालण्याचा आदेश काढून घेण्यात आला होता. पण हा नियम आता पुन्हा लागू केला आहे. ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, अमेरिकेतील जवळजवळ अर्ध्या अॅपल स्टोअरमध्ये ग्राहकांना मास्क घालण्याची आवश्यकता नव्हती. दुसरीकडे, अॅपलने म्हटले आहे की, ग्राहक आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने मास्क अनिवार्य आहे.

कोरोनाचा गेल्या वर्षी उद्रेक झाल्यानंतर अॅपलने आपल्या कर्मचाऱ्यांना महामारीच्या आजाराच्या वेळी घरी राहण्याचा सल्ला दिला होता. तसेच असे करणारी अॅपल पहिली यूएस कंपनी ठरली होती. तसेच या वर्षी सप्टेंबरमध्ये कार्यालय सुरू करण्याच्या तयारीत होते. त्यानंतर, कोरोनाचे वाढते रुग्ण पाहता कालावधी एक महिना म्हणजेच ऑक्टोबरपर्यंत वाढवण्यात आला. त्यानंतर पुढील वर्षी फेब्रुवारीपर्यंत योजना बदलण्यात आली आणि आता त्यात पुन्हा एकदा बदल करण्यात आला आहे. टेक दिग्गज मायक्रोसॉफ्ट कॉर्पने सप्टेंबरमध्ये कामावर परतण्याची तारीख रद्द केली होती.