म्हणून सिंगापूरच्या या मेट्रोस्टेशनचे नाव आहे धोबीघाट
मुंबईतील धोबी घाट अनेकांच्या परिचयाचा आहे. पण दूरदेशीच्या सिंगापूर मध्ये सुद्धा धोबीघाट नाव प्रसिद्ध असून हे सिंगापूरच्या एका मेट्रो रेल्वे स्टेशनचे नाव आहे. हे ऐकून अनेकांना नवल वाटेल पण त्यामागचे कारण मोठे मनोरंजक आहे. या स्टेशनला धोबी घाट नाव पडले तो इतिहास १८१९ सालापर्यंत जातो. या वर्षात सिंगापूर मध्ये प्रथम धोबी म्हणजे कपडे धुवून देणारे व्यावसायिक आले. ते आले भारतातून आणि ब्रिटीश आणि भारतीय शिपायांच्या बरोबर. हे धोबी पंजाब, बिहार आणि तमिळनाडू मधून आले आणि इंग्रजांच्या गरजा पूर्ण करणाऱ्या सेवा क्षेत्राचा एक हिस्सा बनून राहिले. या धोबी समाजाचा सिंगापूर वर मोठा प्रभाव पडला होता.
हा समुदाय त्यावेळच्या ज्या नदीजवळ वस्ती आणि व्यवसाय करत होता त्या नदीचे नाव सुन्गेई बेरास बाशा. मल्याळी भाषेत याचा अर्थ ओल्या तांदळाची नदी. येथे तांदूळ वाळविले जात आणि धोबी कपडे धुण्याचे काम करत. आता येथे नदी नाही पण ब्रिटीश अधिकारी स्टॅनफोर्ड यांच्या नावाचा कालवा आहे. धोबी समुदाय सिंगापूरची जणू विरासत मानला जाऊ लागला होता. त्यामुळे जेव्हा १९८७ मध्ये मेट्रो रेल्वेचे काम सुरु झाले तेव्हा या भागातील स्टेशनचे नाव धोबी घाट ठेवले गेले. आर्चर रोड वरील हा शॉपिंग एरिया असून येथे खाद्य, कला सामग्री, म्युझियम, मॉल्स मोठ्या प्रमाणात आहेत.
सिंगापूरच्या नॅशनल विद्यापीठातील प्रोफेसर राजेश राय यांनी या संदर्भात दिलेल्या माहितीनुसार १८१९ पासून येथे धोबी समुदाय आला पण १०० वर्षे उलटल्यावर सुद्धा त्यांनी कधी येथे स्थायिक होण्याचा विचार केला नव्हता. फार थोडे धोबी कुटुंबासह येत पण बाकी सडे पुरुष असत. तीन चार वर्षे काम करून ते मायदेशी परतत असत. आज सिंगापूर मध्ये धोबी घाट नाही पण त्यांची आठवण या मेट्रो स्टेशनच्या निमित्ताने कायम राहिली आहे.