टीम इंडिया द. आफ्रिकेला रवाना

टीम इंडिया ३ कसोटी आणि ३ वन डे सामने खेळण्यासाठी द.आफ्रिकेच्या दौऱ्यावर गुरुवारी रवाना झाली. २६ डिसेंबरला पहिला कसोटी सामना सेंच्युरियन येथे खेळला जाणार आहे. बीसीसीआयने या संदर्भात चार फोटो शेअर केले असून त्यात जसप्रीत, मयंक अग्रवाल, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज, अजिंक्य राहणे, चेतेश्वर पुजारा, उमेश यादव दिसत आहेत. विशेष म्हणजे या फोटोतून कसोटी कप्तान विराट कोहली गायब आहे.

विराटच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया पहिली कसोटी सेंच्युरीयन येथे खेळत आहे. आत्तापर्यंत या दोन देशात ३९ कसोटी सामने खेळले गेले असून त्यातील १५ द. आफ्रिकेने, १४ भारताने जिंकले आहेत तर १० अनिर्णीत राहिले आहेत. द. आफ्रिकेत एकही कसोटी मालिका भारताला जिंकता आलेली नाही. कप्तान कोहलीने यावेळी काही विशेष करून विजय मिळविण्याचा प्रयत्न राहील असे म्हटले आहे.

विशेष म्हणजे टीम इंडियाला फक्त १ दिवस क्वारंटाइन राहावे लागणार आहे असे द. आफ्रिका क्रिकेट कंट्रोल बोर्डाने जाहीर केले आहे. टीम इंडिया हॉटेल मध्येच एक दिवस क्वारंटाइन होणार असून तेथे एका दिवसात तीन वेळा करोना चाचणी केली जाणार आहे. निगेटिव्ह रिपोर्ट असेल तर खेळाडू हॉटेल बाहेर जाऊ शकतील. दौऱ्यावर जाण्यापूर्वी टीम इंडिया तीन दिवस मुंबईत बायोबबल मध्ये होती आणि त्या काळात तीन वेळा करोना टेस्ट केली गेली आहे. ओमिक्रोनचा धोका आफ्रिकेत अधिक असल्याने बीसीसीआय ने खेळाडूना कुटुंब बरोबर नेण्यास परवानगी दिलेली नाही. जोहान्सबर्ग आणि सेंच्युरीयन मध्ये ओमिक्रोनचा प्रसार वेगाने होत असून भारताला या दोन्ही ठिकाणी पहिल्या दोन कसोटी खेळायच्या आहेत.