उदयनराजे भोसलेंनी दिल्लीत घेतली शरद पवारांची भेट; तर्क-वितर्कांना उधाण!


नवी दिल्ली – राजधानी दिल्लीमधील राजकीय वातावरण गेल्या काही दिवसांपासून चांगलेच तापले आहे. सध्या संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू असून विरोधकांनी खासदार निलंबनाच्या मुद्द्यावरून रान पेटवायला सुरुवात केली असताना दिग्गज नेत्यांच्या वाढलेल्या भेटीगाठींमुळे त्यात अधिकत भर पडताना दिसत आहे. एकीकडे ममता बॅनर्जींपासून शरद पवार व्हाया संजय राऊत अशा सर्वच नेत्यांनी विरोधकांच्या एकजुटीसाठी कंबर कसली असताना दुसरीकडे काही जुनी नेतेमंडळी पुन्हा दिलजमाई करताना दिसू लगली आहेत. आज सकाळी भाजप खासदार उदयनराजे भोसले यांच्या ट्विटमुळे असेच काहीसे चित्र निर्माण झाले आहे. कारण त्यांच्या ट्विटमध्ये थेट शरद पवारांच्या भेटीचा संदर्भ होता.

राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकत उदयनराजे भोसले यांनी भाजपाशी हातमिळवणी केल्यापासून शरद पवार आणि उदयनराजे भोसले यांच्यातील संबंध ताणले गेले आहेत. उदयनराजे भोसले यांनी २०१९च्या लोकसभा निवडणुकांआधीच राष्ट्रवादीला दिलेली सोडचिठ्ठी आणि त्यानंतर साताऱ्यातून त्यांचा झालेला पराभव या गोष्टींमुळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि उदयनराजे भोसले यांच्यामध्ये कमालीचा विरोध दिसून आला. पण, तरीदेखील उदयनराजे भोसले शरद पवारांचा उल्लेख आदराने आणि सन्मानानेच घेताना दिसून आले.


उदयनराजे यांनी गेल्या दोन वर्षांत शरद पवारांवर थेट आणि तीव्र टीका करणे टाळले आहे. या पार्श्वभूमीवर या दोन नेत्यांमध्ये दिल्लीत झालेल्या भेटीमुळे नव्या चर्चेला उधाण आले आहे. उदयनराजे भोसले यांनी या भेटीचा फोटो ट्विट करून या चर्चेला तोंड फोडले आहे. उदयनराजे भोसले यांनी या ट्विटमध्ये आदरणीय खासदार शरद पवार यांची दिल्ली येथील निवासस्थानी सदिच्छा भेट, असे म्हटले आहे. पण, जेव्हा दोन राजकीय नेते भेटतात, तेव्हा राजकीय चर्चा होतातच या उक्तीनुसार या दोन नेत्यांमध्ये नेमकी कोणती ‘सदिच्छा’ चर्चा झाली, यावरून सध्या चर्चा रंगू लागली आहे.