भारतीय महिला संघ विश्वचषक स्पर्धेमध्ये ‘या’ तारखेला भिडणार पाकिस्तानशी


नवी दिल्ली – महिला क्रिकेट विश्वचषक २०२२ चे वेळापत्रक आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) जाहीर केले आहे. मिताली राजच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाचा पहिला सामना ६ मार्च रोजी होणार आहे. पुढील वर्षी न्यूझीलंडमध्ये होणाऱ्या महिला एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तानविरुद्ध भारतीय संघ आपल्या मोहिमेची सुरुवात करणार आहे. सहा मार्च रोजी दोन्ही संघांमधील हा सामना होणार आहे.

न्यूझीलंड आणि वेस्ट इंडिज यांच्यातील ४ मार्च रोजी होणाऱ्या सामन्याने या स्पर्धेची सुरुवात होणार आहे. मंगळवारी विश्वचषकाचे वेळापत्रक आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने जाहीर केले. ३१ दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत एकूण ३१ सामने खेळवले जाणार असून त्यात आठ संघ सहभागी होणार आहेत. पहिला उपांत्य सामना वेलिंग्टन येथे ३० मार्च रोजी होणार आहे. दुसरा उपांत्य सामना ३१ मार्चला तर विजेतेपदाचा सामना ३ एप्रिलला होणार आहे.

क्राइस्टचर्चच्या मैदानावर आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषक २०२२ चा दुसरा उपांत्य आणि अंतिम सामना खेळवला जाईल. ही स्पर्धा राऊंड रॉबिन स्वरूपात खेळली जाईल, जिथे प्रत्येक संघाला इतर प्रत्येक संघाशी स्पर्धा करावी लागेल आणि गुणतालिकेतील अव्वल चार संघ उपांत्य फेरीत प्रवेश करतील. जिथे पहिल्या क्रमांकाच्या संघाला तिसऱ्या क्रमांकाच्या संघाशी आणि दुसऱ्या क्रमांकाच्या संघाला चौथ्या क्रमांकाच्या संघाचा सामना करावा लागेल.

आससीच्या म्हणण्यानुसार, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका आणि भारत आयसीसी महिला चॅम्पियनशिप २०१७-२० मधील त्यांच्या स्थानांवर आधारित या स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत. तर, न्यूझीलंड या स्पर्धेचे यजमान असल्यामुळे या विश्वचषकासाठी आपोआप पात्र ठरले आहे. या विश्वचषकाचे सामने लीग फॉरमॅटमध्ये खेळवले जातील ज्यात आठही सहभागी संघ एकमेकांविरुद्ध खेळतील. त्यानंतर अव्वल चार संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील.

महिला विश्वचषका स्पर्धेतील भारताचे सामने

  • ६ मार्च, भारत विरुद्ध पाकिस्तान, तौरंगा
  • १० मार्च, भारत विरुद्ध न्यूझीलंड, हॅमिल्टन
  • १२ मार्च, भारत विरुद्ध वेस्ट इंडिज, हॅमिल्टन
  • १६ मार्च, भारत विरुद्ध इंग्लंड, तौरंगा
  • १९ मार्च, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया, ऑकलंड
  • २२ मार्च, भारत विरुद्ध बांगलादेश, हॅमिल्टन
  • २७ मार्च, भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका, क्राइस्टचर्च