गेल्या तीन वर्षांत इंधनावरील करांच्या माध्यमातून केंद्र सरकारने कमावले लाखो कोटी; राज्यसभेत अर्थमंत्र्यांची माहिती


नवी दिल्ली – देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींमध्ये गेल्या काही महिन्यांपासून मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्याचे दिसून येत आहे. या किंमती गेला महिनाभर काहीशा स्थिर राहिल्या असल्या, तरी तोपर्यंत पेट्रोलचे दर प्रतिलिटर १००च्याही वर गेले असून डिझेलनेही त्या दिशेने दमदार सुरुवात केली होती. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यामध्ये इंधनाचे दर कमी करण्यावरून टोलवाटोलवी सुरू असताना आता केंद्राने इंधनावरील करांमधून गेल्या तीन वर्षांत केलेल्या कमाईचे आकडे समोर आले आहेत. ही आकडेवारी खुद्द केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनीच दिली आहे.

संसदेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान मंगळवारी राज्यसभेत बोलताना निर्मला सीतारमण यांनी इंधनावरील करांच्या माध्यमातून केंद्राने गेल्या तीन वर्षांत किती कमाई केली, याची माहिती दिली. यानुसार, गेल्या तीन वर्षांत अर्थात २०१८ पासून इंधनावरील करांच्या माध्यमातून केंद्राने तब्बल ८ लाख कोटींची कमाई केली आहे. यापैकी ३.७१ लाख कोटी रुपये तर २०२०-२१ या एकाच वर्षात केंद्राच्या तिजोरीत जमा झाल्याचे निर्मला सीतारमण यांनी राज्यसभेत दिलेल्या लेखी उत्तरात म्हटले आहे.

निर्मला सीतारमण यांनी दिलेल्या माहितीनुसार ५ ऑक्टोबर रोजी पेट्रोलवरील एक्साईज ड्युटी १८.४८ रुपये तर डिझेलवरील एक्साईज ड्युटी १५.३३ रुपये प्रतिलिटर एवढी होती. ती ४ नोव्हेंबर २०२१च्या आकडेवारीनुसार वाढून थेट २७.९० रुपये आणि २१.८० रुपये प्रतिलिटर एवढी झाली आहे. या कालावधीमध्ये ६ जुलै २०१९च्या आकडेवारीनुसार ती काहीशी कमी होत १७.९८ रुपये पेट्रोलसाठी आणि १५.३३ रुपये डिझेलसाठी करण्यात आली होती. मात्र, त्यानंतर पुन्हा त्यात वाढ झाली आहे.