एमपीएससीच्या मुलाखत यादीमध्ये स्वप्निल लोणकरचेही नाव; गोपीनाथ पडळकरांची टीका


मुंबई – पुण्यातील विद्यार्थी स्वप्निल लोणकर याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएसी) परीक्षेत उत्तीर्ण होऊनही नोकरी नसल्याच्या तणावातून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना काही महिन्यांपूर्वी घडली होती. मुलाखत होत नसल्याच्या प्रश्नाबाबत स्वप्निलची आत्महत्त्या चर्चेचे कारण ठरली होती. एमपीएससीच्या २०१९च्या पूर्व व मुख्य परीक्षेत स्वप्नील उत्तीर्ण झाला होता. पण, दीड वर्षांपासून त्याची मुलाखत झाली नव्हती. त्याचबरोबर त्याने २०२० मध्येही एमपीएससीची परीक्षा दिली. त्यामध्ये पूर्व परीक्षा तो उत्तीर्ण झाला. पण, कोरोनामुळे मुख्य परीक्षा झाली नव्हती. या तणावातून आत्महत्या केल्याचे त्याने मृत्युपुर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत लिहिले होते. पण जी मुलाखत दीड वर्षापासून झालेली नव्हती, त्याच मुलाखतीच्या यादीमध्ये आता मृत स्वप्नील लोणकरच्या नावाचा देखील समावेश करण्यात आला आहे.


स्वप्नील लोणकरने मुलाखत रखडल्यामुळे आत्महत्या केली होती. आता मृत्यूनंतर एमपीएसीने मुलाखती यादी जाहीर केली असून या यादीत स्वप्नील लोणकरचे नाव आहे. सात जानेवारीला एमपीएसी परीक्षा पास झालेल्या उमेदवारांच्या मुलाखती होणार आहेत. आत्महत्या केलेल्या स्वप्नील लोणकर याचे नाव यादीत वगळण्यात आलेले नाही. यानिमित्ताने एमपीएसीचाचा भोंगळ कारभार उघड झाला आहे. यावरुन आता विरोधकांकडूनही सरकावर टीका करण्यात येत आहे.

या संदर्भात बोलतोना भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी सरकारला कसलीच लाज उरली नसल्याची टीका केली आहे. ट्विटरवर यासंदर्भातील बातमीचा फोटो पोस्ट करत पडळकर यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. आधी उत्तीर्ण होऊन दिड वर्ष झाली, तरी मुलाखतीला बोलवले नाही. म्हणून आत्महत्या करायला भाग पाडले, आता आत्महत्येचीही क्रूर थट्टा करत आहेत. प्रस्थापितांच्या सरकारला कसलीच लाज उरली नाही. विद्यार्थ्यांच्या भावनेशी खेळणाऱ्या या गिधाडी प्रवृत्तीचा धिक्कार असो, असे गोपीचंद पडळकर यांनी म्हटले आहे.