रुपाली पाटील यांचा ‘मनसे’ धक्का; राष्ट्रवादीत करणार प्रवेश?


पुणे – मनसेच्या सदस्यत्वाचा माजी नगरसेविका आणि प्रवक्त्या रुपाली पाटील यांनी राजीनामा दिला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आजपासून तीन दिवस पुणे दौऱ्यावर असणार आहेत. परंतु, राज ठाकरेंच्या पुणे दौऱ्यापूर्वीच मनसेला मोठा धक्का बसल्याचे पाहायला मिळत आहे. रुपाली पाटील यांची मनसे सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर पुढची भुमिका काय असणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अशात आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी रुपाली पाटील आज पत्रकार परिषद घेण्याची शक्यता आहे.

मनसेने राज्यातील आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कंबर कसली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. पुढील तीन दिवस राज ठाकरे पुणे जिल्हा आणि पुणे शहराच्या दौऱ्यावर आहेत. पण, राज ठाकरे पुण्यात येण्याआधीच रुपाली पाटील यांनी राजीनामा दिल्यामुळे ऐन महापालिका निवडणुकीपूर्वी मनसेला धक्का बसल्याचे बोलले जात आहे. रुपाली पाटील यांनी मनसेला ‘जय महाराष्ट्र’ केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती मिळत आहे. शुक्रवारी त्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचे घड्याळ हातात बांधू शकतात, अशी सुत्रांची माहिती आहे.

रुपाली पाटील-ठोंबरे यांची मनसेचा पुण्यातील चेहरा म्हणून ओळख होती. रुपाली पाटील अनेकदा महिलांचे प्रश्न मांडताना दिसायच्या. तसेच त्यांचा जनसंपर्कही दांडगा आहे. परंतु, त्या पक्ष सोडणार असल्याची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून होती. त्या पक्षात नाराज होत्या. काही दिवसांपूर्वी त्यांनी आपली नाराजी उघडपणे बोलूनही दाखवली होती. अशातच रुपाली पाटील-ठोंबरे यांच्या राजीनाम्यामुळे मनसेला मोठा धक्का बसला आहे. दरम्यान, रुपाली पाटील यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एक पत्र लिहिले आहे. या पत्रात त्यांनी मी माझ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षातील सर्व पदासह पक्षाचा प्राथमिक सदस्य पदाचा राजीनामा देत असल्याचे नमूद केले आहे.