पंकजा मुंडेंची ओबीसी आरक्षणाविना होणाऱ्या निवडणुकांवर प्रतिक्रिया


मुंबई – राज्य सरकारकडून सर्वोच्च न्यायालयात ओबीसी आरक्षणासंदर्भात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे. न्यायालयाने आधीच केंद्र सरकारला इम्पिरिकल डेटा देण्याचे निर्देश देता येणार नसल्याचे स्पष्ट केल्यामुळे राज्यात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या ओबीसी आरक्षणाविनाच होणार आहेत. याबद्दल आपले मत भाजपा नेत्या आणि ओबीसींचा प्रमुख चेहरा असलेल्या नेत्या पंकजा मुंडे यांनी व्यक्त केले आहे.

पंकजा मुंडे यासंदर्भात माध्यमांशी बोलताना म्हणाल्या, माध्यमांमधून माझ्यापर्यंत आलेल्या माहितीनुसार सर्वोच्च न्यायालयाने एक गोष्ट स्पष्ट केली आहे की इम्पिरिकल डेटा देण्याचे काम हे सर्वस्वी राज्य सरकारचे आहे. हे आम्ही अनेकदा सांगितले आहे की राज्य सरकारने हा डेटा केंद्राकडे मागण्याची गरज नव्हती. जर हा डेटा राज्य सरकारने गोळा केला असता, तर आज ही वेळ आली नसती. आरक्षणाशिवाय होणारी ही निवडणूक हा ओबीसींवर होणारा अन्याय आहे. ही निवडणूक पुढे ढकलण्यात यावी, ही गोष्ट निवडणूक आयोगाला पटवून देण्यातही राज्य सरकार अपयशी ठरलेले आहे. आजच्या या निर्णयामुळे ओबीसी समाजाचे घोर नुकसान झालेले आहे.