‘या’मुळे महेश मांजरेकरांनी सोडला ‘मराठी बिग बॉस’


बिग बॉस मराठीला छोट्या पडद्यावरील वादग्रस्त आणि तितकाच लोकप्रिय शो म्हणून ओळखले जाते. बिग बॉस मराठीचे सध्या तिसरे पर्व सुरु आहे. स्पर्धकांमध्ये या पर्वाच्या सुरुवातीपासून सुरु असलेली भांडण, टास्कदरम्यान होणारे वाद, दररोज येणारे ट्विस्ट यामुळे बिग बॉसला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. बिग बॉसच्या तिसऱ्या पर्वातील विजेता लवकरच जाहीर होणार आहेत. पण त्या आधीच या शो मधून बाहेर पडण्याचा निर्णय बिग बॉसचे सूत्रसंचालक महेश मांजरेकर यांनी घेतला आहे. यामागचे कारण नुकतेच समोर आले आहे.

बिग बॉसच्या घरात नुकतेच एलिमिनेशन राऊंड पार पडला. यात गायत्री दातारने बिग बॉसच्या घरातून एक्झिट घेतली. पण नुकत्यात झालेल्या बिग बॉसच्या चावडीदरम्यान महेश मांजरेकर न दिसल्यामुळे त्यांनी हा शो सोडल्याबाबत विविध चर्चा रंगल्या होत्या. बिग बॉसचे शेवटचे काही भाग शिल्लक असताना त्यांनी हा शो का सोडला? असा प्रश्नही अनेक चाहते उपस्थित करत आहे.

महेश मांजरेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोग्याच्या कारणामुळे त्यांनी हा कार्यक्रम सोडला आहे. सध्या त्यांची तब्येत चांगली नसल्यामुळे त्यांनी हा शो मध्येच सोडावा लागला आहे. महेश मांजरेकर यांच्याजागी आता अभिनेता सिद्धार्थ जाधव हे सूत्रसंचालकाची भूमिका बजावताना दिसत आहे.

सध्या बिग बॉसच्या घरात सातच स्पर्धक शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे लवकरच या स्पर्धकांचा बिग बॉसच्या घरातील प्रवास संपणार आहे. लवकरच बिग बॉसच्या पर्वातील विजेता कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पण आता महेश मांजरेकर हे या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणार नसल्यामुळे त्यांचे अनेक चाहते दु:खी झाल्याचे पाहायला मिळत आहे