नव्या वर्षात निघणार सिडकोच्या पाच हजार घरांसाठी लॉटरी


मुंबई : नवी मुंबईत परवडणाऱ्या घरांचे स्वप्न पाहणाऱ्या नागरिकांचे घर घेण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे. सिडकोच्या वतीने नवी मुंबईत पाच हजार घरांसाठी लॉटरी प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. याबाबतची माहिती राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. ही घरे नवी मुंबईतील कळंबोली, तळोजा आणि द्रोणागिरी आदी ठिकाणी असणार आहेत.

सिडकोच्या वतीने नवी मुंबईत पाच हजार घरांची ‘महागृहनिर्माण’योजना आहे. या घरकुल योजनेअंतर्गत अत्यल्प उत्पन्न गट, अल्प उत्पन्न गटांतील नागरिकांकरिता घणसोली, खारघर, कळंबोली, तळोजा आणि द्रोणागिरी येथे घरे उपलब्ध होणार आहेत. या घरांसाठीच्या लॉटरीची प्रक्रिया जानेवारी 2022 पासून सुरू करण्यात येणार असल्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले.


म्हाडा, सिडकोकडून घरांसाठी सोडत कोरोनामुळे काढण्यात आली नव्हती. म्हाडाकडून नव्या घरांच्या सोडतीसाठी चाचपणी सुरू असल्याची चर्चा सुरू आहे. तर, सिडकोच्या पाच हजार घरांसाठीची लॉटरी प्रक्रिया नव्या वर्षात सुरू करणार असल्याचे जाहीर केले आहे. कोरोना महासाथीनंतर ही लॉटरी निघणार असल्यामुळे घर खरेदीच्या प्रतिक्षेत असलेल्यांकडून मोठा प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे.