हिंदू वोट बँक छत्रपती शिवाजी महाराजांनी केली विकसित; चंद्रकांत पाटील यांचे अजब वक्तव्य


पुणे – राजकीय पक्षांच्या उमेदवारांच्या निवडणूक तिकिटांबाबत बोलताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या वक्तव्यावरून आता नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. कारण चंद्रकांत पाटील यांनी यावेळी चर्चेचा रोख हिंदू व्होटबँकेपर्यंत नेला. हिंदू व्होट बँक छत्रपती शिवाजी महाराजांनी विकसित केली, वाजपेयी-मोदींनी त्यावर कळस चढवल्याचे वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केले. त्यांच्या या वक्तव्यावरून नवा वाद सुरू होण्याची शक्यता आहे.

मंगळवारी पुण्यातील भाजप कार्यालयात पत्रकार परिषदेला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी संबोधित केले. त्यांनी त्यावेळी उमेदवारांच्या निवडणूक तिकिटाबाबत भाष्य केले. तिकिट हे पक्षाचे असते. व्होट बँक पक्षाची असते. व्होटबँक ही वर्षानुवर्षे मेहनत घेऊन तयार केलेली असते. छत्रपती शिवाजी महाराजांनी ही हिंदुत्वाची व्होट बँक तयार केली. अलिकडच्या काळात ही व्होट बँक अटल बिहारी वाजपेयी, आडवाणी, मोदी यांनी त्यावर कळस चढवला, असे वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केले.

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यावर टीका केली आहे. काँग्रेसचे सरचिटणीस सचिन सावंत यांनी म्हटले की, असे वक्तव्य करून चंद्रकांत पाटील यांनी अक्कलेचे तारे तोडले आहेत. शिवरायांचा अवमान करणारी ही भाजपची छिंदम प्रवृत्ती आहे. व्होट बॅंकेच्या हिन राजकारणाशी शिवरायांचा संबंध जोडता? असा सवालही त्यांनी केला. शिवराय हे सद्विचारांचे प्रतिक आहेत व भाजप कुविचारांचे- त्यामुळे तुलना पातकच असून पाटील यांनी माफी मागण्याची मागणी सावंत यांनी केली.

तर अमोल मिटकरी यांनी म्हटले की, कोणीही पाटील यांच्या वक्तव्याचे समर्थन करणार नाही, त्यांचे इतिहासाबाबत किती ज्ञान आहे, हे तपासण्याची आवश्यकता आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांना हिंदूपुरते सीमित करण्याचे काम भाजप-संघाकडून सुरू आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी रयतेचे राज्य उभारले. चंद्रकांत पाटील यांचे वक्तव्य बालिश असल्याची टीका मिटकरी यांनी केली.