तामिळनाडूतील हेलिकॉप्टर दुर्घटनेतून बचावलेले ग्रुप कॅप्टन वरुण सिंग यांचे निधन


नवी दिल्ली – तामिळनाडूतील हेलिकॉप्टर दुर्घटनेतून बचावलेले ग्रुप कॅप्टन वरुण सिंग यांचे निधन झाले आहे. बंगळुरु येथील कमांड रुग्णालयात दुर्घटनेत जखमी झाल्यानंतर त्यांच्यावर उपचार सुरु होते. संरक्षण दलांचे प्रमुख (सीडीएस) जनरल बिपिन रावत यांच्यासह इतर १३ जणांचा दुर्घटनेत बुधवारी मृत्यू झाला होता. यावेळी फक्त वरुण सिंग दुर्घटनेतून बचावले होते. ते लवकर बरे व्हावेत, यासाठी संपूर्ण देशभरातून प्रार्थना केली जात होती. पण बधुवारी दुर्दैवाने उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले.

लष्कराचे हेलिकॉप्टर तमिळनाडूतील कुन्नूर येथे कोसळून झालेल्या भीषण अपघातात जनरल बिपीन रावत आणि त्यांच्या पत्नीसह १३ जणांचा बुधवारी मृत्यू झाला. वरुण सिंग या दुर्घटनेत गंभीर जखमी झाले होते. ते जवळपास ४५ टक्के भाजले होते. त्यांच्यावर लष्करी रुग्णालयात उपचार सुरू होते. ज्या डिफेन्स सर्व्हिसेस स्टाफ कॉलेज, वेलिंग्टन येथे सीडीएस बिपिन रावत व्याख्यानासाठी गेले होते, त्याच सुलूर हवाई तळावर वरुण सिंग विंग कमांडर होते.

भारतीय हवाई दलाच्या अधिकाऱ्यांनी १२ डिसेंबरला ग्रुप कॅप्टन वरुण सिंग यांची प्रकृती चिंताजनक असली, तरी स्थिर असल्याचे सागितले होते. त्याचबरोबर वरुणच्या तब्येतीत चढ-उतार होत आहेत, परंतु एक सैनिक असल्याने तो ही लढाई जिंकेल, असा मला विश्वास असल्याचे भोपाळ येथे राहणारे त्यांचे निवृत्त वडील कर्नल केपी सिंग पीटीआयशी बोलताना सांगितले होते.

त्यांच्यावर सर्वोत्तम वैद्यकीय सुविधा, उत्तम तज्ज्ञ उपचार करत आहेत. संपूर्ण देश त्याच्यासाठी प्रार्थना करत आहे. त्याला ओळखत नसलेले किंवा सेवानिवृत्त झालेले किंवा सेवा देणारे बरेच लोक भेटायला आले आहेत. अनेक महिला देखील त्याला भेटायला येत आहेत, हे सर्व पाहून मी भावूक झालो आहे. तो एक सैनिक आहे आणि तो लवकरच ही लढाई जिंकून बाहेर येईल, असे केपी सिंग म्हणाले होते. पण वरुण सिंग यांची दुर्दैवाने बुधवारी मृत्यूसोबची झुंज अपयशी ठरली.