फिलिपीन्सहून गँगस्टर सुरेश पुजारीला भारतात आणले


नवी दिल्ली – अखेर कुख्यात गँगस्टर सुरेश पुजारीला भारतात आणले असून त्याला फिलिपीन्समधून ऑक्टोबर महिन्यात अटक करण्यात आली होती. मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवलीमध्ये त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत.

याशिवाय पोलिसांना मुंबई आणि कर्नाटकात तो वसूलीच्या अनेक प्रकरणांमध्ये हवा होता. भारतात त्याला आणल्याची माहिती एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याकडून देण्यात आलेली आहे. पुजारीला आयबी आणि सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी दिल्ली विमानतळावर ताब्यात घेतले. केंद्रीय यंत्रणांच्या चौकशीनंतर त्याला मुंबई पोलिसांच्या ताब्यात दिले जाणार आहे. मुंबई गुन्हे शाखेची एक टीम पुजारीला ताब्यात घेण्यासाठी अगोदरच दिल्लीत पोहचलेली आहे. मुंबई आणि ठाणे पोलिसांनी जबरदस्ती वसुलीच्या अनेक प्रकरणांनंतर २०१७ आणि २०१८मध्ये त्याच्या विरोधात रेड कॉर्नर नोटीस देखील काढली होती.

त्याचबरोबर अधिकाऱ्याने हे देखील सांगितले की, १५ वर्षांपेक्षा अधिक काळापासून पुजारी फरार होता आणि ऑक्टोबरमध्ये फिलिपीन्समध्ये त्याला अटक केली गेली होती. त्याच्याविरोधात ठाण्यात जबरदस्ती वसुलीचे २३ गुन्हे दाखल आहेत. सुरेश हा गँगस्टर रवी पुजारीचा जवळचा नातलग आहे आणि २००७ मध्ये त्याच्यापासून तो वेगळा झाला होता. त्यानंतर तो परदेशात पळून गेलेला होता. सुरूवातीच्या काळात त्याने रवी पुजारी आणि अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन सोबत काम केले आणि नंतर त्याने स्वत:ची गँग तयार केली होती.