लसीकरणाच्या नियमांचे जे कर्मचारी पालन करणार नाही, त्यांना रजेवर पाठवणार; गुगलचा कर्मचाऱ्यांना इशारा


वॉशिंग्टन – कोरोना महामारीने जगभरात हाहाकार माजवला आहे. कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटने अनेक देशांची चिंता वाढवली आहे. याला अमेरिकाही अपवाद नाही. सुरुवातीपासून अमेरिकेला कोरोना विषाणूचा सर्वाधिक फटका बसल्याचे दिसते. आत्तापर्यंत जगभरात सर्वाधिक कोरोना मृत्यूंची नोंद अमेरिकेत झाल्याचे एका अभ्यासातून समोर आले आहे. ८ लाख मृत्यूंचा आकडा अमेरिकेने पार केल्याचे या अभ्यासात म्हटले आहे. तब्बल २ लाख मृत्यू हे लसीकरण मोहिम सुरू करण्यात आल्यानंतर झाल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. त्यातच आता गुगल कंपनीने महत्वाचा निर्णय घेतला आहे.

आपल्या कर्मचार्‍यांना गुगलने इशारा दिला आहे की, कोरोनाविरोधातील लसीकरणाच्या नियमांचे पालन न केल्यास ते त्यांचा पगार गमावतील अन्यथा त्यांना कामावरून काढून टाकण्यात येईल. मंगळवारी अंतर्गत कागदपत्रांचा हवाला देऊन ही माहिती सीएनबीसीने दिली आहे.

गुगलच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रसारित केलेल्या मेमोमध्ये असे म्हटले होते की, कर्मचार्‍यांना ३ डिसेंबरपर्यंत त्यांची लसीकरणाची स्थिती कंपनीला सांगणे आणि पुरावा दर्शविणारी कागदपत्रे अपलोड करणे आवश्यक आहे. त्या तारखेनंतर, कंपनी अशा कर्मचार्‍यांशी संपर्क साधण्यास सुरुवात करेल, ज्यांनी लसीकरणाबद्दल माहिती दिली नाही किंवा लसीकरण केलेले नाही. जे कर्मचारी १८ जानेवारीपर्यंत लसीकरणाच्या नियमांचे पालन करणार नाही, त्यांना ३० दिवसांसाठी कंपनीकडून पगारी सुट्टीवर पाठवले जाईल. त्यानंतर सहा महिने त्यांना बिनपगारी रजेवर पाठवण्यात येईल आणि नंतर कामावरून काढले जाईल.

दरम्यान सीएनबीसीच्या अहवालावर गुगलने थेट कोणतीही प्रतिक्रिया दिली नसली तरी ते म्हणाले, आम्ही आमच्या कर्मचार्‍यांना लसीकरणात मदत करण्यासाठी आणि आमच्या लसीकरण धोरणात सहकार्य करण्यासाठी शक्य ते सर्व काही करण्यास वचनबद्ध आहोत.