कोविड टास्क फोर्स प्रमुखांच्या ओमिक्रॉनबाबत वक्तव्यामुळे वाढली चिंता


नवी दिल्ली – देशात सध्या ओमिक्रॉनच्या नव्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर जास्तीत जास्त लसीकरणावर लक्ष केंद्रित केले जात आहे, तर दुसरीकडे, देशाच्या कोरोना टास्क फोर्सचे प्रमुख आणि निती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांनी केलेल्या वक्तव्यामुळे आणखी चिंता वाढण्याची शक्यता आहे. मंगळवारी व्ही. के. पॉल यांनी सांगितले की, नव्या ओमिक्रॉन व्हेरिएंटवर आपली कोरोनावरील लस कुचकामी ठरण्याची शक्यता असल्यामुळे आता चिंतेत वाढ झाली आहे. डॉ. व्ही. के. पॉल यांनी याआधी वाढत्या रुग्णसंख्येबाबत धोक्याचा इशारा दिला होता. लोकांच्या बेपर्वाईवर बोट ठेवत डॉ. पॉल यांनी आपण जोखीम पत्करत असल्याची चिंता व्यक्त केली होती.

आपल्या लसी उदयोन्मुख परिस्थितीत कुचकामी ठरण्याची दाट शक्यता असल्यामुळे कोरोनाच्या नवीन प्रकाराला तोंड देण्यासाठी संघटित होऊन लस तयार करण्याची गरज आहे. औषधांच्या विकासात ठोस दृष्टिकोनाची गरज असल्याचे डॉ. व्ही. के. पॉल यांनी म्हटले. मी गेल्या तीन आठवड्यांपासून ओमिक्रॉनच्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर, अशा शंका कशा समोर आल्या आहेत, हे आम्ही पाहिले आहे. त्यापैकी काही खऱ्या असू शकतात. आपल्याकडे अद्याप अंतिम चित्र स्पष्ट नसल्याचेही पॉल म्हणाले.

पॉल म्हणाले की, सध्याचे प्राधान्य हे सर्वांना लस मिळण्याचे आहे आणि कोणीही मागे राहणार नाही. साथीच्या रोगाचा सामना करण्यासाठी विज्ञानात गुंतवणूक करण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली. याबाबत इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, पॉल म्हणाले की, सध्या ही लस जगापर्यंत पोहोचावी आणि कोणीही मागे राहू नये, हीच प्राथमिकता आहे. महामारीचा सामना करण्यासाठी विज्ञानातील गुंतवणुकीवरही भर देण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. सीआयआय पार्टनरशिप समिटमध्ये पॉल बोलत होते.

याआधी आपण आणि आता जोखमीच्या परिस्थितीत वावरत आहोत. धोकादायक क्षेत्रामध्ये देश आहे. मास्कचा वापर कमी झाला आहे. मास्कचा वापर आणि लसीकरण किती महत्त्वाचे आहे, हे आपण लक्षात घेतले पाहिजे, असे डॉ. पॉल म्हणाले. जगभरातील ओमिक्रॉन प्रादुर्भावाच्या परिस्थितीतून आपण धडा घेणे आवश्यक आहे. नव्या विषाणूने जागतिक चिंतेत भर घातली आहे. जागतिक आरोग्य संघटनेनेही मास्क आणि लसीकरणाचा आग्रह धरला आहे. या दोन्ही गोष्टींकडे आपणही दुर्लक्ष करू नये, असे डॉ. पॉल यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, भारतातील ओमिक्रॉनच्या रुग्णांची संख्या आता ६१ वर पोहोचली आहे. त्याच वेळी, ब्रिटनमध्येही ओमिक्रॉनचा वेगाने प्रसार होत आहे. जानेवारीपासून ब्रिटनमध्ये सर्वाधिक नवीन कोविड प्रकरणे नोंदली गेली आहेत. एकट्या ब्रिटनमध्ये ओमिक्रॉनची प्रकाराची ५ हजार प्रकरणे समोर आली आहेत.