रुपाली पाटील मनसेला सोडचिठ्ठी दिल्यानंतर साधला उपनेत्यावर टीकास्त्र


पुणे : मनसे नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पुणे दौऱ्याआधीच आपल्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. रुपाली पाटील राज्यभरात मनसेच्या आक्रमक महिला नेतृत्व म्हणून परिचित होत्या. महापालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर त्यांचा राजीनामा हा मनसेला मोठा धक्का मानला जात आहे. पक्षाचे नेते अनिल शिदोरे यांच्याकडे राजीनामा देण्यात आला आहे. रुपाली पाटील यांनी आज पत्रकार परिषद घेत मनसेच्या उपनेत्यांवर टीकास्त्र सोडले आहे.

गेल्या काही दिवसांपासून पक्षातील नेते किशोर शिंदे आणि बाबू वागसकर यांच्यावर रुपाली पाटील या नाराज होत्या. या दोघांनाही काम नसून रिकामटेकडे असल्याची टीका त्यांनी पत्रकार परिषदेत केली. याबाबत त्यांनी उघडपणे नाराजी देखील जाहीर व्यक्त केली होती. त्यांनंतर त्यांनी पक्षाच्या विविध कार्यक्रमाला देखील हजेरी लावली नव्हती.

रुपाली पाटील यांची नाराजी दूर होईल, असे सांगितले जात असतानाच ऐन निवडणुकीच्या तोंडावर पक्षाला राजीनामा दिल्यामुळे पक्षासाठी मोठा धक्का मानला जात आहे. रुपाली पाटील लवकरच राष्ट्रवादी किंवा शिवसेनेत जाहीर प्रवेश करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. समीर वानखेडे प्रकरणावर त्यांनी दिलेल्या प्रतिक्रियेनंतर रूपाली पाटील यांचा सगळा वाद सुरू झाला. दलितांवर समीर वानखेडे यांनी अन्याय केल्याचे आरोप होत आहेत, तर त्याची चौकशी करायला हवी अशी भूमिका त्यांनी घेतली होती.

पण पक्षाचे उपनेते बाबू वागस्कर आणि रूपाली पाटील यांच्यात त्यावरून वाद झाला होता. प्रवक्ते पद नसताना रूपाली पाटील यांनी पक्षाच्या भूमिका मांडायला नको, असे वागस्कर यांचे म्हणणे होते. पण त्याला रुपाली पाटील यांनी जोरदार विरोध केला. वागसकर यांच्या पत्नीलाच शहराध्यक्ष पद देऊन माध्यमांना केवळ त्यांच्याशीच बोलावे, असे सांगण्यात आल्यामुळे रूपाली पाटील कमालीच्या दुखावल्या होत्या. आपण सगळ्या तक्रारी राज ठाकरेंपर्यंत पोहोचवल्या, पण त्यावर काहीही कारवाई झाली नाही. आपला आता त्यांच्यावर कुठलाही रोष नसून कालही ते आपले दैवत होते आजही आहे आणि उद्याही राहतील, असे ही रुपाली पाटील यांनी म्हटले आहे.