तीन वर्षाच्या मुलांसाठी सहा महिन्यात येतेय कोविड लस

देशात तीन वर्षाच्या मुलांपासून पुढील वयोगटासाठी कोविड १९ ची लस पुढच्या सहा महिन्यात उपलब्ध होत असल्याचे सिरम इन्स्टीटयूटचे सीईओ अदार पूनावाला यांनी सांगितले. करोनाच्या नव्या ओमिक्रोन व्हेरीयंटचा प्रसार भारतात होऊ लागल्याच्या पार्श्वभूमीवर ही बातमी आल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. पूनावाला म्हणाले, येत्या सहा महिन्यात लहान मुलांसाठीची ‘ कोवावॅक्स’ लाँच केली जाणार आहे.

पूनावाला यांनी दिलेल्या माहितीनुसार या लसीच्या चाचण्या सध्या सुरु असून ३ ते १८ वयोगटातील मुलांवर या चाचण्या केल्या जात आहेत. या चाचण्यांचे आत्तापर्यंतचे रिपोर्ट समाधानकारक आहेत. सुदैवाने लहान मुलांमध्ये करोनाची लक्षणे फार गंभीर नाहीत त्यामुळे फार काळजीची गरज नाही. पण तरीही सहा महिन्यात लस आणली जाईल आणि अधिकृतपणे  सरकारी घोषणा झाली कि लसीकरण कार्यक्रम जाहीर केला जाईल.

सिरम ही जगातील सर्वात मोठी लस निर्मिती करणारी कंपनी आहे. सरकारने दिलेल्या आकडेवारीनुसार सिरम सध्या दरमहा कोवीशिल्ड लसीचे दरमहा २५ ते २७.५ कोटी डोस उत्पादन करत आहे तर दुसरी कंपनी भारत बायोटेक त्यांच्या कोवॅक्सिन लसीचे दरमहा ५ ते ६ कोटी डोस उत्पादित करत आहे.