कोल्हापूर कन्या लीना, फ्रेंच लग्झरी ब्रांड ‘शनेल’च्या सीईओ पदी
जगभरातील बड्या कंपन्यांची धुरा भारतवंशियांच्या हाती येऊ लागली असल्याने जगात भारतीय टॅलेंटचा आब वाढला आहे. सोशल मिडिया प्लॅटफॉर्म ट्वीटरच्या सीईओ पदी पराग अग्रवाल यांची नेमणूक झाल्यानंतर पाठोपाठ फ्रांसच्या जगप्रसिद्ध लग्झरी ब्रांड शनेलच्या ग्लोबल चीफ एग्झीक्यूटीव्ह पदी भारतवंशी लीना नायर यांची निवड करण्यात आली असून जानेवारी २०२२ मध्ये त्या पदभार स्वीकारत आहेत. यापूर्वी त्यांनी युनिलिव्हर मध्ये चीफ ह्युमन रिसोर्स ऑफिसर म्हणून जबाबदारी पार पडली आहे.
शनेल या आंतरराष्ट्रीय ब्रांडच्या माध्यमातून सूट, क्विल्टेड हँडबॅग्ज, नंबर ५ परफ्युम अशी अनेक लग्झरी उत्पादने विकली जातात. लीना नायर यांनी गेली ३० वर्षे युनिलिव्हर मध्ये काम केले असून युनिलिव्हरचे सीईओ एलन जोप यांनी लीना यांचे योगदान कंपनीसाठी फार मोलाचे असल्याचे म्हटले आहे.
विशेष म्हणजे लीना नायर मुळच्या महाराष्ट्रातील कोल्हापूरच्या आहेत. त्यांचे शालेय शिक्षण कोल्हापूरच्या होली क्रॉस कॉन्व्हेन्ट मध्ये झाले असून सांगलीच्या वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयातून त्यांनी इलेक्ट्रिकल इंजिनिअरची पदवी घेतली आहे. त्यानंतर जमशेदपूरच्या सेंट झेव्हिअर स्कूल ऑफ मॅनेजमेंट मधून एमबीए मध्ये त्यांनी गोल्ड मेडल मिळविले आहे. त्यांनी करियरची सुरवात त्यावेळच्या हिंदुस्थान लिव्हर मधून केली त्याचेच नाव आता युनिलिव्हर आहे.
आठ वर्षापूर्वी लीना भारतातून लंडन येथे शिफ्ट झाल्या आणि २०१६ मध्ये त्यांना प्रमोशन मिळाले व त्या युनीलिव्हरच्या पहिल्या महिला, पहिल्या आशियाई आणि सर्वात कमी वयाच्या सीएचआरओ बनल्या. फॉर्च्यून इंडियाच्या मोस्ट पॉवरफुल वूमन यादीत त्यांचा समावेश केला गेला आहे. लीना यांनी त्यांच्या सोशल मिडिया अकौंटवर शनेलची सीईओ म्हणून काम करायला मिळते आहे हा सन्मान असल्याचे आणि युनीलिव्हर सोबत काम केल्याचा नेहमीच अभिमान वाटेल असे म्हटले आहे. कंपनीने नेहमीच खूप प्रेम दिले, येथे नेहमीच सन्मान मिळाला असेही त्यांनी लिहिले आहे.