विश्वसुंदरीच्या मुकुटाविषयी काही खास

भारताच्या हरनाज संधू हिने यंदाची मिस युनिव्हर्स २०२१ सौंदर्य स्पर्धा जिंकून भारताचे नाव पुन्हा एकदा रोशन केले आहे. २१ वर्षानंतर भारताने पुन्हा एक विश्वसुंदरी जगाला दिली आहे. यापूर्वी सुश्मिता सेन आणि लारा दत्ता या दोघींनी ही स्पर्धा जिंकली होती. या स्पर्धेत विश्वसुंदरी म्हणून निवड झाल्यावर संबंधित सुंदरीला अनेक बक्षिसे मिळत असतात पण सर्वाधिक चर्चा असते ती ‘मिस युनिव्हर्स क्राऊन’ म्हणजे मुकुटाची. स्पर्धा सुरु होताच साऱ्या जगाच्या नजरा यंदाचा ताज कुणाच्या शिरावर विराजमान होणार याची प्रतीक्षा करू लागतात. दरवर्षी होणारी ही स्पर्धा प्रथम १९५२ साली झाली होती.

मिस युनिव्हर्सचा क्राऊनही खास असतोच. पण हा महागडा मुकुट विजेती सुंदरी फक्त वर्षभर तिच्यासोबत ठेऊ शकते नंतर तो परत करावा लागतो. विश्वसुंदरी स्पर्धेत दिला गेलला आत्तापर्यंतचा सर्वात महागडा मुकुट कोणता हे जाणून घेताना समोर आलेली माहिती अशी-

भारताच्या हरनाज संधूचा मिस युनिव्हर्स क्राऊन सध्या जगभर चर्चेत आहे. मोआद मिस युनिव्हर्स क्राऊन असे त्याचे नाव असून संबंधित कंपनीने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकौंट वर या मुकुटाचे फोटो शेअर केले आहेत. फीलस्टार लाईफच्या रिपोर्ट नुसार या मुकुटाची किंमत ५ दशलक्ष डॉलर्स म्हणजे ३.७ कोटी रुपये आहे. त्याला पॉवर ऑफ युनिटीचे प्रतिक म्हटले जात आहे. त्यावर १७२५ सफेद हिरे आणि तीन गोल्डन कॅनरी डायमंड जडविले गेले आहेत.

ही स्पर्धा प्रथम १९५२ मध्ये सुरु झाली तेव्हा पहिला मुकुट शिरावर घालण्याचे भाग्य लाभलेल्या सुंदरीचे नाव होते आर्मी कृसेला. ती फिनलंडची होती. तेव्हाही बनविल्या गेलेल्या मुकुटाची किंमत ३ कोटी हून अधिक होती. २०१४ मध्ये पोलिना वेगा ही अशी पहिली सुंदरी बनली जिला डायमंड इंटरनॅशनल इनकॉर्पोरेटेड क्राऊन घातला गेला. त्यात डायमंड होतेच पण क्रिस्टल्स, सफायर, टोपाझ अशी मौल्यवान रत्ने सुद्धा जडविली गेली होती. त्याची किंमत होती २.२ कोटी.

१९९४ मध्ये जेव्हा सुश्मिता सेन विश्वसुंदरी बनली तेव्हा तिला मिळालेल्या मुकुटाची किंमत फार नव्हती. त्याचे नाव होते ‘मिस क्राऊन’ विशेष म्हणजे २८ वेळा हाच क्राऊन वापरला गेला आणि लारा दत्त हिला सुद्धा हाच मुकुट मिळाला होता. या क्राऊनवर महिलेची आकृती होती.२००२ ते २००७ या काळात मिकीमोटी कंपनीने डिझाईन केलेला क्राऊन वापरला गेला त्याची किंमत १.८ कोटी होती.