टाइमने ‘ पर्सन ऑफ द ईअर’ साठी एलोन मस्क यांची केली निवड

जगप्रसिद्ध आणि प्रतिष्ठित टाईम मासिकाने यंदाच्या पर्सन ऑफ द ईअर सन्मानासाठी टेस्लाचे संस्थापक सीईओ आणि स्पेस एक्सचे सर्वेसर्व एलोन मस्क यांची निवड केली आहे. ५० वर्षाचे मस्क प्रत्यक्षात टेक्नोलॉजी मग्नेट आहेत असे या निवडीचे मागचे कारण दिले गेले आहे. १९२७ पासून दरवर्षी टाइम मासिकाकडून अशी निवड केली जात आहे. एडिटर चीफ एडवर्ड फेल्सेनथल यांनी एलोन मस्क यांच्या नावाची घोषणा केली.

एडवर्ड म्हणाले, जगातील प्रभावशाली व्यक्तीची यांसाठी निवड केली जाते. मस्क यांनी स्पेस तंत्रज्ञान क्षेत्राला नवा आयाम दिला आहे. मस्क यांचा प्रभाव पृथ्वी बरोबरच पृथ्वीच्या बाहेर सुद्धा पडलेला दिसतो आहे. त्यांची खूप स्वप्ने आहेत आणि ती पूर्ण करण्यासाठी ते सातत्याने प्रयत्नशील आहेत. ट्वीटवर मस्क यांचे ६.६ कोटी फॉलोअर्स आहेत. अमेरिकन जीवनात त्यांचा प्रभाव वाढत चालला आहे. त्यामुळे मस्क यांची दखल घेणे भाग आहे. स्पेस एक्सच्या माध्यमातून ते पुन्हा एकदा अमेरिकन लोकांना चंद्र सफर घडविण्याचा प्रयत्न करत आहेत.

मस्क यांच्या एक ट्वीटवर क्रीप्टो करन्सीचे भाव खालीवर होतात असे दिसून आले आहे. मस्क यांनी निवड घोषित होण्यापूर्वी एक मुलाखत या मासिकाला दिली होती. त्यात त्यांनी टेस्ला हा कार इंडस्ट्रीसाठी एक संदेश असल्याचे म्हटले होते. तसेच आउटडोर स्पेस मिशन हे त्यांच्यासाठी खास असल्याचे सांगून आणखी काही ग्रहांवर मानवी वस्ती झाली पाहिजे यासाठी प्रयत्नशील असल्याचे नमूद केले होते. मस्क जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत प्रथम क्रमांकावर असून त्यांची संपत्ती ३०० अब्ज डॉलर्स आहे.