२० व्या शतकातले महागडे पुस्तक ठरले हॅरी पॉटर

जगात कित्येक वस्तू अश्या आहेत ज्या महागड्या म्हणून ओळखल्या जातात. पण २० व्या शतकात एक पुस्तक महागडे ठरले आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत मोहिनी पडलेल्या आणि खास लोकप्रियता मिळालेल्या या पुस्तकचे नाव आहे, ‘हॅरी पॉटर अँड फिलोसॉफर्स स्टोन’. या पुस्तकाची पहिली प्रत अमेरिकेतील एका लिलावात ४७१००० डॉलर्स म्हणजे ३,५६,६२,९४२ रुपयांना विकली गेली आहे. या पुस्तकाची किंमत साडेतीन कोटींच्या पार गेली तेव्हाच हे रेकॉर्ड बनले होते. विसाव्या शतकातील सर्वात महाग फिक्शन बुक अशी त्याची नोंद झाली आहे.

या पुस्तकाची पहिली आवृत्ती १९९७ मध्ये प्रसिद्ध झाली. हार्ड कव्हर बायंडिंगची ही ब्रिटीश एडिशन आहे. अमेरिकेत हेच पुस्तक हॅरी पॉटर अँड सोर्केरर्स स्टोन या नावाने प्रसिद्ध झाले होते. यापूर्वी सुद्धा या प्रतीचा लिलाव झाला तेव्हा त्याला १.४ कोटी किंमत मिळाली होती. आता हे पुस्तक एका अमेरिकन संग्रहाकाने लिलावात विकले असून ग्राहकाचे नाव जाहीर केले गेलेले नाही.

ब्रिटीश लेखिका जे के रोलिंग हिचे हे पहिलेच पुस्तक. या पुस्तकाने ती एकदम प्रसिद्धीच्या झोतात आली. त्यानंतर तिने याच मालिकेतील ६ पुस्तके लिहिली. त्याच्या ५० कोटी प्रती जगभरात विकल्या गेल्या. ८० भाषांत या पुस्तकांचे अनुवाद झाले आणि त्यावर ८ चित्रपट निघाले. या चित्रपटांनी सुद्धा ग्लोबल बॉक्स ऑफिसवर कोट्यावधींची कमाई केली आहे.