ओमिक्रॉनच्या पहिल्या बळीची ब्रिटन मध्ये नोंद

ब्रिटन मध्ये करोनाचे नवे व्हेरीयंट ओमिक्रॉनने पहिला बळी घेतल्याचे पंतप्रधान बोरिस जोन्सन यांनी सोमवारी जाहीर केले असून जगातील सुद्धा हा पहिलाच ओमिक्रॉन मृत्यू आहे. बोरिस यांनी देशात पुन्हा लॉकडाऊन जाहीर करण्याचा कोणताही विचार नसल्याचे स्पष्ट केले आहे मात्र पात्र नागरिकांनी बुस्टर डोस घ्यावा असे आवाहन केले आहे. करोना साठी कोणतेही खास प्रतिबंध जाहीर केले गेलेले नाहीत.

या पार्श्वभूमीवर ओमिक्रॉन संदर्भात नवे संशोधन समोर आले आहे. त्यानुसार ओमिक्रॉन एकट्या युके मध्ये ७५ हजार बळी घेऊ शकेल असा अंदाज व्यक्त केला गेला आहे. हॉस्पिटल मध्ये भरती होणार्यांची संख्या सुद्धा लक्षणीयरित्या वाढेल असा इशारा संशोधकानी दिला आहे. जगभर या विषाणूचा फैलाव अतिशय वेगाने होत आहे. आत्तापर्यंत तो ६५ देशात पोहोचला आहे आणि ब्रिटन मध्ये तो अति उग्र रूप धारण करू शकेल असे म्हटले जात आहे. एप्रिल २०२२ पर्यंत येथे हा विषाणू २५ ते ७५ हजार मृत्यू घडवू शकेल असे वैज्ञानिकांचे म्हणणे आहे. द. आफ्रिकेत या विषाणूमुळे अजून एकही बळी गेलेला नाही मात्र तेथल्यापेक्षा ब्रिटन मध्ये या विषाणूची वर्तणूक वेगळी असल्याचे संशोधकांचे म्हणणे आहे.

डेली मेलच्या रिपोर्ट नुसार लंडन स्कूल ऑफ हायजीन अँड ट्रॉपीकल मेडिसिन व द. आफ्रिकेच्या स्टेलन बोश विद्यापीठातील संशोधकांनी केलेल्या संशोधनात ओमिक्रॉन विषयी समोर येत असलेले आकडे भयावह आहेत. त्यामुळे करोनासंदर्भात लादले गेलेले प्रतिबंध हटविले जाऊ नयेत असा इशारा दिला गेला आहे. ओमिक्रॉन मुळे चार लाखाहून अधिक संक्रमिताना हॉस्पिटल मध्ये दाखल करण्याची वेळ येऊ शकते आणि रोगप्रतिकार शक्ती कमी झाली तर हे आकडे आणखी वाढू शकतात असे संकेत मिळत आहेत. लंडन मध्ये ओमिक्रॉन संक्रमितांची संख्या ४० टक्के झाली असल्याचेही सांगितले जात आहे.