या पट्ठ्याने चोवीस तासात घेतले कोविड लसीचे दहा डोस

करोनाचे नवे व्हेरीयंट ओमिक्रोन जगभर वेगाने प्रवास करू लागल्याने धास्तावलेले लोक कोविड १९ लसीचा दुसरा डोस घेण्यासाठी आता लाईन लावू लागल्याचे दृश्य सर्वत्र दिसू लागले आहे. मात्र अनेकांना दुसरा किंवा अगदी पहिला डोस मिळण्यास सुद्धा अडचणी येत आहेत. न्यूझीलंड मध्ये मात्र एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका व्यक्तीने २४ तासात कोविड १९ लसीचे चक्क दहा डोस घेतले आहेत. यामुळे न्यूझीलंडच्या आरोग्य मंत्रालयाची भंबेरी उडाली असल्याचे समजते. जगात असा प्रकार बहुदा प्रथमच घडला असावा असे सांगितले जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार या व्यक्तीने शहरातील विविध लसीकरण केंद्रावर जाऊन एका दिवसात लसीचे दहा डोस घेतले. लसीकरण प्रमुख प्रबंधक एस्त्रीड कॉर्नीफ यांच्या म्हणण्यानुसार हा प्रकार चिंताजनक आहे. एका दिवसात इतके डोस घेतल्याचा काय परिणाम संबंधित व्यक्तीवर होईल याचा अंदाज करणे अवघड आहे. कारण या संदर्भातला कुठलाच डेटा उपलब्ध नाही. या व्यक्तीने लस डोस घेतल्यावर पैसे दिले जात असल्याने असे डोस घेतले आहेत असे समजते. यामुळे दुसरी अडचण अशी आहे कि ज्या व्यक्तींच्या नावाचा वापर करून त्याने हे डोस घेतले त्या त्या व्यक्तींची नोंद आता लसवंत म्हणून झाली आहे. पण प्रत्यक्षात त्यांना डोस मिळालेलेच नाहीत.

ऑकलंड विद्यापिठातील लस तज्ञ हेलन पेटीयोसीस म्हणाल्या, आजपर्यंत असा प्रकार कधीच घडला नाही. त्या व्यक्तीच्या प्रकृतीवर याचा काय आणि कसा परिणाम होणार हे आत्ताच सांगणे अवघड आहे. यापूर्वी ब्राझील मध्ये एका व्यक्तीने अडीच महिन्यांच्या कालावधीत कोविड १९ लसीचे ५ डोस घेतल्याचा प्रकार घडला होता. मात्र त्या व्यक्तीच्या प्रकृतीवर त्याचा दुष्प्रभाव झाला नव्हता असे सांगितले जात आहे.