पंतप्रधान मोदींचे ट्वीटर हँडल हॅक

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ट्वीटर हँडल शनिवारी रात्री दोन च्या सुमारास हॅक केले गेल्याने ट्वीटर कार्यालय तसेच पंतप्रधान कार्यालयात एकच हलकल्लोळ माजला. अर्थात थोड्याच वेळात अकौंट पुन्हा दुरुस्त केले गेले. गेल्या १४ महिन्यात पंतप्रधानांचे ट्वीटर अकौंट हॅक होण्याची ही दुसरी वेळ आहे.

मिळालेल्या माहितीनुसार शनिवारी रात्री २ वा.१४ मिनिटांनी पंतप्रधानाच्या ट्वीटर अकौंट वर एक ट्वीट आले. त्यात भारत सरकारने अखेर बीटकॉइन लीगल टेंडरचा स्वीकार करण्यास मान्यता दिल्याचे आणि सरकार ५०० बिटकॉइंस खरेदी करणार असल्याचे आणि सर्व नागरिकांना बीटकॉईन वाटली जाणार असल्याचे ट्वीट करून फ्री बीटकॉइन मिळण्यासाठी एक लिंक शेअर करावी असे म्हटले गेले होते. पंतप्रधान कार्यालयाने हे ट्वीट डिलीट करण्यापूर्वीच काही युजर्सनी त्याचा स्क्रीन शॉट शेअर करायला सुरवात केली त्यामुळे अधिक गोंधळ उडाला.

ट्वीटरच्या सीईओ पदी पराग अग्रवाल यांची नुकतीच नेमणूक झाल्यानंतर हा प्रकार घडल्याने ट्वीटर कार्यालयात एकाच गोंधळ उडाला. ट्वीटर प्रवक्त्याने २४ x ७ पंतप्रधान कार्यालयाशी संपर्कात असून टीमने कॉम्प्रमाइज्ड अकौंट सिक्यूअर करण्यासही सर्व आवश्यक उपाययोजना केल्याचे जाहीर केले आहे. अशी आणखी ट्वीट आली तर इग्नोअर करा असे सांगितले आहे. पंतप्रधान कार्यालयाकडून सुद्धा अकौंट हॅक झाल्याचे लगेच जाहीर केले गेले. यापूर्वी सप्टेंबर २०२० मध्ये पंतप्रधानांच्या पर्सनल वेबसाईटशी जोडलेले अकौंट हॅक केले गेले होते. त्यात पीएम केअर फंड साठी बिटकॉइन डोनेट करण्याचे आवाहन केले गेले होते.