जगातील पहिले पेपरलेस सरकार बनले दुबई सरकार

जगात पूर्ण पेपरलेस सरकार बनण्याचा विक्रम दुबई सरकारने केला असून अमिरातीचे क्राऊन प्रिन्स शेख हमदान बिन मुहम्मद बिन रशीद अल मकतूम यांनी या संदर्भातली घोषणा केली आहे. त्यात ते म्हणतात सरकारचे सर्व काम डिजिटल पद्धतीने सुरु झाल्याने वर्षाला ३५ कोटी अमेरिकन डॉलर्स व १.४ कोटी श्रम तासांची बचत होणार आहे. या पद्धतीत सर्व अंतर्गत तसेच बहिर्गत देवघेवी व दुबई सरकारच्या सर्व प्रक्रिया १०० टक्के डिजिटल पद्धतीने होणार आहेत. त्यासाठी व्यापक डिजिटल सरकारी सेवा प्लॅटफॉर्म सुविधा उपलब्ध झाली आहे.

सर्व प्रक्रिया डिजिटल करण्याचे काम पाच टप्प्यात पूर्ण केले गेले असून पाचव्या टप्प्यात सर्व सेवा कार्यान्वित झाल्या. प्रत्येक टप्प्यात दुबईच्या विभिन्न समूहाचे व्यवहार डिजिटल गेले गेले तर पाचव्या टप्प्यात अमिराती मधील सर्व ४५ सरकारी विभागांना ही कार्यप्रणाली लागू झाली. या सर्व ४५ विभागात १८०० डिजिटल सेवा प्रदान करण्यात येत असून १०,५०० देवघेव व्यवहार होतात. यामुळे कागदाचा वापर ३३६ दशलक्ष कमी झाला असून त्यामुळे ३५ कोटी डॉलर्स वाचणार आहेत. या सेवेमुळे सर्व रहिवाश्यांना स्मार्ट सिटी अनुभव अधिक समृध्द झाल्याचा अनुभव येईल असे सांगितले जात आहे. यामुळे कागद, पेपर, कागदपत्रे यांची आवश्यकता पूर्ण संपुष्टात आल्याचा दावा केला जात आहे.