काशीविश्वेश्वर कॉरिडोरचे आज मोदींच्या हस्ते लोकार्पण

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज म्हणजे १३ डिसेंबर रोजी काशीविश्वेश्वर कॉरिडोरचे लोकार्पण करत आहेत. त्यासाठी प्रथम पंतप्रधान क्रुझवरून ललिता घाट येथे येऊन कलशात गंगाजल भरून घेणार आहेत आणि पायी कॉरिडोर मधल्या मंदिरांच्या मणीमाला प्रणाम करून विश्वनाथ मंदिराच्या गर्भगृहात जलाभिषेक करत आहेत. त्यापूर्वी प्रथेप्रमाणे कोतवाल बाबा भैरव यांची अनुमती घेऊन गंगास्मरण करत मोदी मंदिरात प्रवेश करत आहेत. या कार्यक्रमासाठी गंगेचे सर्व घाट, मंदिरे, गल्ल्या सजल्या आहेत. अभिषेक झाल्यावर मोदी उपस्थिताना संबोधित करणार आहेत.

या कार्यक्रमात मोदी आणखी एक अनोखा कार्यक्रम करणार आहेत. येथे मोदी फोटो सेशन करणार आहेत मात्र त्यात कुणाही बड्या नेत्याचा सहभाग नाही. काशीविश्वेश्वर धाम पूर्ण करण्यासाठी रात्रंदिवस अथक मेहनत घेतलेल्या मजुरांसोबत मोदी फोटो काढणार आहेत आणि त्यानंतर याच लोकांच्या बरोबर भोजन करणार आहेत. ऐनवेळी पूर्वीचा कार्यक्रम बदलून मोदी यांनी नवा कार्यक्रम आखल्याचे सांगितले जात आहे.

यापूर्वी सुद्धा कुंभ मेळ्यात साफसफाईचे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे पाय धुवून पंतप्रधान मोदी यांनी त्यांना अनोखा सन्मान दिला होता. त्याचीच पुनरावृत्ती काशी मध्ये होत आहे. विश्वनाथ अभिषेक आणि लोकार्पण समारंभ सुरु असताना देशभरातील प्रसिद्ध शिवमंदिरात भाजपचे जेष्ठ नेते उपस्थित आहेत आणि ५१ हजार जागी मोठे स्क्रीन लावून या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण देशातील विविध ठिकाणी केले जात आहे. ७०० कोटी खर्चाचा हा प्रकल्प ३३ महिन्यात पूर्ण केला गेला आहे.