चीफ ऑफ डिफेन्स स्टाफच्या या आहेत जबाबदाऱ्या

देशाचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपीन रावत यांच्या अपघाती मृत्युनंतर यांच्या जागी कुणाची नियुक्ती होणार याची चर्चा सुरु झाली आहे. रावत यांनी १ वर्ष आणि ३४१ दिवस या पदावर काम करताना उत्तम कामगिरी बजावली असून सेनेच्या तिन्ही दलात समन्वय ठेऊन सैन्य आधुनिकीकरणाचे मोठे काम त्यांनी या काळात केले आहे.

चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ या पदाच्या जबाबदाऱ्या कोणत्या, त्यांना पगार किती मिळतो, त्याच्या हाताखाली किती स्टाफ असतो याची माहिती फारशी ज्ञात नाही. मिळालेल्या माहितीनुसार चीफ ऑफ आर्मी स्टाफचा कार्यकाल ३ वर्षे किंवा वयाची ६५ वर्षे पूर्ण या पैकी जे लवकर येईल त्यानुसार ठरतो. जनरल रावत ६२ व्या वर्षी थल सेना प्रमुख पदावरून निवूत्त झाल्यावर त्यांची या पदावर नेमणूक केली गेली होती. हे पद सेनेतील सर्वात मोठे पद असून त्याचा दर्जा चार स्टार आहे. सेनेच्या ज्या दलाशी ही व्यक्ती  संबंधित असेल तोच गणवेश त्यांना घालावा लागतो. त्यांच्या एम्ब्लेम मध्ये सोन्याच्या तारेने अशोकचक्र शिवाय तिन्ही दलाचे प्रतिक चिन्ह असते.

सीडीएसच्या कार्यालयात १ अतिरिक्त सचिव, पाच संयुक्त सचिव शिवाय सपोर्ट स्टाफ असतो. सीडीएस पदाची मुख्य जबाबदारी सेनेच्या तिन्ही दलांचा ताळमेळ घालून त्यांच्यात कोणत्याही मोहिमेचा समन्वय करून देणे, सैन्याचे आधुनिकीकारण, संरक्षण मंत्र्यांचे मुख्य सल्लागार म्हणून काम, शस्त्र खरेदी प्रक्रिया मार्गी लावणे, मिलिटरी अफेअर्स डीलिंग, तिन्ही दलाशी संबंधित संस्था, एजन्सी संबंधी सायबर वा स्पेस कमांड देणे. डिफेन्स प्लॅनिंग कमिटीचे काम पाहणे, अनावश्यक खर्चावर नियंत्रण, न्युक्लीअर कमांड सल्ला अशी असते. सीडीएस पदासाठी मासिक अडीच लाख पगार, बंगला शिवाय अन्य अनेक सुविधा दिल्या जातात.

भारतासाठी सीडीएस पद असले पाहिजे याचा विचार लॉर्ड माउंटबॅटन यांच्या काळातच झाला होता. मात्र काही ना काही कारणाने त्याची अंमलबजावणी टाळली जात होती. मोदी सरकार सत्तेत आल्यावर २०१९ मध्ये त्यावर त्वरित कार्यवाही झाली आणि बिपीन रावत देशाचे पहिले सीडीएस बनले.