तेजस्वी यादव यांच्या पत्नीने लग्नापूर्वीच केला हिंदू धर्माचा स्वीकार
राष्ट्रीय जनता दलाचे नेते आणि बिहार मधील विरोधी पक्ष नेते तेजस्वी यादव यांचा विवाह गुरुवारी अगदी मोजक्या लोकांच्या उपस्थितीत पार पडला असला तरी या विवाहाची चर्चा आता जोर धरू लागली आहे. मिडिया रिपोर्ट नुसार तेजस्वी त्यांची बालपणातली मैत्रीण रचेल हिच्याबरोबर विवाहबद्ध झाले असले तरी रचेल धर्माने ख्रिस्चन आहे. त्यामुळे विवाहापूर्वी तिने हिंदू धर्माचा स्वीकार केल्यावरच हा विवाह हिंदू पद्धतीने केला गेला आहे.
तेजस्वी यांचे वडील लालूप्रसाद आणि आई राबडीदेवी यांना तेजस्वी यांचा हा विवाह पंसत नव्हता. याचे मुख्य कारण रचेल क्रिश्चन आहे हेच होते. लालू आणि रबडी यांच्या सर्व अपत्यांचे विवाह यादव कुळातच झाले आहेत. आंतरधर्मीय विवाह केल्यास राजकीय क्षेत्रात चुकीचा संदेश जाईल याची भीती लालू यांना वाटत होती, त्यामुळे त्यांचा या विवाहाला विरोध होता. अखेर तेजस्वी यांनी रचेल यांना धर्म बदलावा यासाठी राजी केले त्यानुसार त्यांनी हिंदू धर्म स्वीकारला. त्यानंतर त्यांचे नाव बदलून राजेश्वरी यादव असे केले गेले असेही समजते.
तेजस्वी यांनी अखेर लालू आणि रबडी यांचीही समजूत घालून त्यांना लग्न मंडपात आणण्यात यश मिळविले. या विवाहाला राजदच्या नेत्यानाही आमंत्रण दिले गेले नाही. अगदी मोजक्या लोकांच्या उपस्थितीत हा विवाह झाला. बुधवार पर्यंत तर विवाहाची बातमी गुप्तच ठेवली गेली होती. मात्र तेजस्वी यांच्या बहिणीने ट्वीटरवर तेजस्वी विवाह करत असल्याची पोस्ट केल्यावर त्याची चर्चा सुरु झाली होती.