न्यूझीलंड होणार सिगरेट मुक्त देश

न्यूझीलंड सरकारने गुरुवारी एक महत्वाची घोषणा केली असून आजच्या १४ वर्षांखालील मुलांना आयुष्यात कधीच देशात सिगारेट विकत घेणे किंवा ओढणे शक्य होणार नाही असे जाहीर केले आहे. न्यूझीलंडने तयार केलेल्या नव्या नीतीनुसार २०२४ पासून टप्प्याटप्प्याने न्यूझीलंडची वाटचाल सिगरेट मुक्त देश होण्याची असेल आणि २०२७ पासून देशात सिगरेट किंवा तंबाखूजन्य पदार्थ विक्री बंद होईल. तंबाखू व तंबाखूची सर्व उत्पादनांवर बंदी घालून निकोटीनची पातळी कमी करणे हा मुख्य उद्देश त्यामागे असल्याचे समजते.

न्यूझीलंडच्या आरोग्य विभागाच्या राज्यमंत्री आयशा बेराल म्हणाल्या, देशात धुम्रपान केलेच जाऊ नये यासाठी प्रयत्न सुरु झाले आहेत. तंबाखू विक्री, खरेदी आणि पुरवठा हा गुन्हा मानला जाणार आहे. गेल्या दशकात देशात धूम्रपानाचे प्रमाण कमी झाले आहे मात्र नवीन कायद्यामुळे आत्ता ज्यांचे वय १४ किंवा त्यापेक्षा कमी आहे त्यांना पुढील काळात म्हणजे २०२७ पासून देशात कधीच सिगारेट खरेदी करता येणार नाही. यावर विक्रेत्यांनी काळाबाजार वाढेल असे मत मांडले आहे मात्र सरकारने त्यांचे म्हणणे मान्य केलेले नाही.

न्यूझीलंडमध्ये २०२४ पासून टप्प्याटप्प्याने सिगरेटवर बंदी घातली जाणार आहे. सरकारी आकडेवारीनुसार देशात १५ वर्षावरील सर्व युवक सिगरेट ओढतात. तरुण तसेच आगामी तरुणाईला सिगरेट पासून दूर ठेवण्यासाठी २०२२च्या शेवटी कायदा करण्यात येत आहे. हे विधेयक पुढच्या वर्षात संसदेत मांडले जाणार आहे आणि २०२४ पासून कायद्याची अंमलबजावणी केली जाणार आहे. न्यूझीलंड मध्ये दरवर्षी धुम्रपान केल्याने ५ हजार मृत्यू होतात आणि १८ वर्षाखालच्या प्रत्येक ५ मुलांमध्ये ४ मुले धुम्रपान करतात.