काय असतो विमान, हेलिकॉप्टर मध्ये असलेला ब्लॅक बॉक्स

देशाचे पहिले चीफ ऑफ आर्मी स्टाफ बिपीन रावत यांचे हेलिकॉप्टर दुर्घटनेत निधन झाल्यावर चर्चा सुरु झाली आहे ती हेलिकॉप्टरचा ब्लॅक बॉक्स सापडला असल्याची. कोणत्याही विमान किंवा हेलिकॉप्टरला अपघात झाला की प्रथम शोध घेतला जातो तो या ब्लॅक बॉक्सचा. काय असतो हा ब्लॅक बॉक्स?

ब्लॅक बॉक्स असे जरी या पेटीला म्हटले जात असले तरी प्रत्यक्षात ही पेटी लाल किंवा ऑरेंज रंगाची असते. जेव्हा विमान किंवा हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त होते तेव्हा या ब्लॅकबॉक्सवरून विमानाच्या सर्व हालचाली आणि संभाषण समजू शकते कारण या बॉक्स मध्ये सर्व रेकॉर्ड झालेले असते. यालाच फ्लाईट डेटा रेकॉर्डर असेही म्हणतात. हा बॉक्स सुरक्षित राहावा म्हणून अत्यंत मजबूत धातू टायटेनियम पासून तो बनविला जातो. आतही त्याला सुरक्षा भिंती असतात. याच्या आतील भिंतींचा रंग काळा असतो त्यावरून याला ब्लॅक बॉक्स असे नाव आहे. बाहेरून याला लाल किंवा केशरी रंग असतो त्यामागे हा रंग कुठूनही चटकन नजरेत भरतो हे कारण आहे.

१९५० च्या दशकात विमान उड्डाणे अधिक संख्येने होऊ लागली आणि त्याचबरोबर विमान अपघातांचे प्रमाण सुद्धा वाढू लागले. या अपघातांमागचे कारण शोधणे अवघड होत असे कारण बहुतेक वेळा उंचावरून कोसळल्याने विमान जळून जात असे आणि विमानातील लोक जिवंत राहण्याची शक्यता फारशी नसे. त्यामुळे अपघात कोणत्या चुकीने झाला हे कळले तर त्या चुका टाळता येतील यासाठी काही उपकरण हवे अशी गरज निर्माण झाली आणि त्यातून ब्लॅक बॉक्स तयार करण्यात आला.

हा बॉक्स इतका मजबूत असतो की तासभर तो १०००० डिग्री तापमान सुद्धा सहन करू शकतो. विशेष म्हणजे एक महिना विनावीज तो काम करू शकतो. त्यामुळे हा बॉक्स शोधायला वेळ लागला तरी आतील डेटा सेफ राहतो. अपघात झाला कि या बॉक्स मधून सतत आवाज येत राहतात. अगदी समुद्रात २० हजार फुट खोलीवर सुद्धा त्यातून आवाज आणि तरंग येत रहातात तेही सतत ३० दिवस.

विमान अपघातात कारण समजण्याचे दुसरे साधन आहे कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर. हा ब्लॅक बॉक्सचाच एक हिस्सा असतो. अपघाताच्या अगोदर शेवटच्या दोन तासातील आवाज त्यात रेकॉर्ड झालेले असतात. इंजिनचा आवाज, आणीबाणी अॅलार्म, पायलट, को पायलटचे संदेश, बोलणे त्यात समजू शकते. ब्लॅक बॉक्स सापडल्यावर तो कापून आतल्या आवाजांचे विश्लेषण केले जाते आणि अपघातामागचे कारण जाणून घेण्याचा प्रयत्न केला जातो.