एलीयन्स चीनच्या पाळतीवर?

चीनच्या हवाई दल पायलट आणि कोपायलट यांनी हॉंगकॉंग आणि तैवान यांच्या मधील समुद्रावर अज्ञात उडत्या तबकड्यांच्या ताफा पाहिल्याचा दावा करून त्याचे फुटेज पुरावा म्हणून दिले आहे. २४ नोव्हेंबरला तैवान आणि हॉंगकॉंग यांच्या मध्ये समुद्रावर सुरवातीला ९ चमकदार वस्तू वेगाने जाताना आणि लगेच त्यांची संख्या १२ वर गेल्याचे त्यांनी सांगितले. कॉकपिट मधुनच त्यांनी या वस्तूंचे फुटेज घेतले असून या उडत्या तबकड्या होत्या असा दावा केला आहे.

एव्हीएशन तज्ञांच्या मते या फुटेज मध्ये सुरवातीला ९ चमकदार वस्तू दिसत आहेत आणि नंतर त्यांची संख्या १२ वर गेल्याचे दिसले आहे. हा एलियन्सचा ताफा असावा आणि ते शक्ती प्रदर्शन करत असावेत असे म्हटले जात आहे. पायलट आणि को पायलटने घेतलेल्या फुटेज मध्ये काही आवाज रेकॉर्ड झाले आहेत. त्यात ‘ हे काय आहे? या स्पेसक्राफ्टचे दिवे अचानक पेटत आहेत आणि लगेच विझत आहेत’ असेही शब्द रेकॉर्ड झाले आहेत. सोशल मिडिया साईट युट्यूब वर स्कॉट वॉर्निंग यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ आत्तापर्यंत लाखो लोकांनी पाहिला आहे आणि त्यावर प्रतिक्रियांचा पाउस पडला आहे.

काही युजर्सनी समुद्रावर परग्रहवासी त्यांच्या शक्तीचे प्रदर्शन करत आहेत असे म्हटले आहे तर काही युजर्सनी चीनच्या हल्ल्यांमुळे त्रासलेले इलियन्स त्यांच्यावर पाळत ठेऊन आहेत असे म्हटले आहे.