आणखी काही वर्षात भारताची लोकसंख्या घटणार

लान्सेट या प्रसिद्ध विज्ञान मासिकात एक अहवाल नुकताच प्रसिद्ध झाला असून त्यात जगाची लोकसंख्या भविष्यात वाढणार तर नाहीच पण उलटी कमी होईल असे निरीक्षण नोंदविले गेले आहे. सध्या जगाची लोकसंख्या ७.८ अब्ज आहे. २०६४ मध्ये ती उच्चतम पातळीवर म्हणजे ९.७ अब्जांवर जाईल. त्यानंतर मात्र लोकसंख्येला उतरती कळा लागेल आणि २१०० सालापर्यंत ती कमी होऊन ८.७९ अब्जांवर येईल आणि त्यानंतर कमीच होत राहील असे म्हटले गेले आहे. अर्थात ही घटना प्रत्यक्षात दिसायला अजून ५३ वर्षे वाट पहावी लागणार असली तरी हे असेच घडणार हे निश्चित असल्याचे संशोधक सांगत आहेत.

लोकसंख्या कमी होण्यासाठीं अनेक गोष्टी कारणीभूत ठरतील. जगभरात जन्मदर कमी झाल्याने आणि वृद्ध संख्या कमी होऊ लागल्याने हे घडेल. किमान २३ देशात ही परिस्थिती असेल असे सांगितले जात आहे. त्यात जपान, थायलंड, स्पेन, पोर्तुगाल, दक्षिण कोरिया या देशांची लोकसंख्या ५० टक्के घटेल. जगात सध्या लोकसंख्येत आघाडीवर असलेल्या चीनची सध्याची १.४ अब्ज संख्या २१०० सालापर्यंत घटून ७३.२ कोटींवर येईल असेही हा अहवाल सांगतो. या उलट आफ्रिका खंडातील देशांची लोकसंख्या वाढेल आणि ती १.०३ अब्जांवरून ३.०७ अब्जांवर जाईल असेही यात म्हटले गेले आहे.

भारताचा विचार करायचा तर भारताची लोकसंख्या १.४ अब्जांवरून कमी होऊन २१०० सालापर्यंत १.०९ अब्जांवर येण्याची शक्यता आहे. यापूर्वी १४ व्या शतकात जगाच्या लोकसंख्येत अशी घट दिसली होती. त्यावेळी प्लेगच्या साथीमुळे हे घडले होते. शास्त्रज्ञांच्या मते यावेळी लोकसंख्या कमी होण्यात महामारी कारण नसेल तर जन्मदर कमी होणे, हवामान बदलामुळे उष्णता वाढणे, नैसर्गिक साधन संपत्ती कमी होणे, पाणी कमी होणे, हवेत ऑक्सिजन प्रमाण कमी होणे, मशीन अधिक वापरात आल्याने मानवी शरीरातील स्नायूंची ताकद कमी होत जाणे, रोगप्रतिकार शक्ती कमी होणे अशी अनेक कारणे असतील.