तेजस्वी यादव यांची पत्नी एलेक्सीस माजी हवाईसुंदरी

बिहारचे माजी उपमुख्यमंत्री, लालूंच्या राष्ट्रीय जनता दलाचे राजकीय वारसदार तेजस्वी यादव गुरुवारी दिल्लीच्या साकेत स्थित फार्म हाउसवर लग्नबंधनात अडकले आहेत. विवाह होईपर्यंत तेजस्वी यांची वधू कोण याची उत्सुकता कायम राहिली होती.आता त्यांच्या पत्नीच्या नावाचा खुलासा झाला असून तिचे नाव एलेक्सीस रसेल असे असल्याचे समजते. मिळालेल्या माहितीनुसार एलेक्सीस ख्रिचन धर्मीय आहेत. त्यामुळे या विवाहास लालू प्रसाद यांची संमती नव्हती. पण गेली सहा वर्षे एलेक्सीसच्या प्रेमात पडलेल्या तेजस्वी यांनी अखेर आईवडिलांची समजूत घालून संमती मिळविली असे सांगितले जात आहे. हा विवाह अगदी कमी लोकांच्या उपस्थितीत हिंदू रिवाजानुसार पार पडला असे समजते.

या विवाह समारंभास उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पार्टीचे नेते अखिलेश यादव, पत्नी डिम्पल यांच्या सह हजर होते. हा आंतरधर्मीय विवाह असल्यानेच अगदी मोजक्या लोकांना आमंत्रण दिले गेले असेही सांगितले जात आहे. तेजस्वी यांची पत्नी एलेक्सीस यांनी हवाई सुंदरी म्हणून काम केले आहे. या दोघांची ओळख शाळेपासून होती मात्र या मैत्रीचे २०१४ पासून प्रेमात रुपांतर झाले होते. त्यानंतर सात वर्षांनी हे विवाहबद्ध झाले आहेत.

तेजस्वी यांना विवाहासाठी आत्तापर्यंत ४४ हजार प्रस्ताव व्हॉटस अप वर आले होते असे समजते. मात्र तेजस्वी यांनी त्यांचे हृदय एलेक्सीसला पूर्वीच दिले असल्याने यातील कोणत्याही प्रस्तावाचा विचार त्यांनी केला नव्हता. तेजस्वी यांचे शिक्षण नववी पास आहे.