सौंदर्य स्पर्धेसाठी उंटांना हार्मोन इंजेक्शन, ४० उंट स्पर्धेतून बाद

जगातील सर्वात मोठा आणि लोकप्रिय कॅमल फेस्टिव्हल सौदी अरेबिया देशात सुरु झाला त्याला आता २१ वर्षे झाली आहेत. २००० सालापासून हा महोत्सव सुरु केला गेला. किंग अब्दुल अजीज कॅमल ब्युटी कॉन्टेस्ट या नावाने सुद्धा तो ओळखला जातो. राजधानी रियाध च्या उत्तर पूर्वेला असलेल्या वाळवंटात ४० दिवस हा उत्सव दरवर्षी साजरा होतो आणि सर्वात मोठा कॅमल फेस्टिव्हल म्हणून त्याची नोंद गिनीज बुक मध्ये केली गेली आहे. या उत्सवात अनेक प्रकारच्या उंट स्पर्धा होतात आणि त्यासाठी ६० दशलक्ष डॉलर्सची बक्षिसे दिली जातात. यात उंटाची सौंदर्यस्पर्धा होते. यंदा या स्पर्धेत होत असलेला गैरव्यवहार शोधण्यासाठी खास प्रगत तंत्राचा वापर केला गेला असून जज लोकांनी सौंदर्यस्पर्धेतील ४० उंटाना अगोदरच स्पर्धेबाहेर केले आहे. निवड चाचणीत हे उंट फेल झाले आहेत.

या मागचे कारण थोडे मजेदार आहे. क्रीडा स्पर्धेत खेळाडूंनी उत्तेजक द्रव्ये घेतल्याच्या बातम्या आपण नेहमी वाचतो, तसेच या उंटाना स्नायू मजबूत दिसावेत, चेहरा तजेलदार दिसावा म्हणून हार्मोन इंजेक्शने दिली गेल्याचे उघड झाले आहे. याला बोटोक्स इंजेक्शन असे म्हटले जाते. उंट मालकांनी उंटाच्या डोके, मान, कुबड, पोशाख आणि चेहरा यांची परीक्षा घेऊन नंबर देणाऱ्या ज्युरीना धोका देण्यासाठी या कॉस्मेटिक प्रक्रियांचा वापर केल्याचे उघडकीस आले आहे. बोटोक्स इंजेक्शन दिल्याने उंटाचे नाक, तोंड, मान, कुबड मोठे आणि अधिक बलशाली दिसते. पण ही चलाखी लक्षात आल्यावर या उंटाना स्पर्धेतून बाद करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी जगभरातील विविध देशातून उंट येतात असेही समजते.