सीडीएस बिपीन रावत यांच्यावर उद्या दिल्लीत अंत्यसंस्कार

तामिळनाडूच्या कुन्नूर जिल्हात हवाईदलाचे एमआय १७ व्ही ५ हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त होऊन झालेल्या अपघातात देशाचे पहिले सीडीएस बिपीन रावत, त्यांच्या पत्नी आणि अन्य ११ जणांचा मृत्यू झाला असून गुरुवारी सायंकाळी हे सर्व मृतदेह दिल्ली मध्ये आणले जात आहेत. रावत यांच्यावर दिल्ली कॅट मध्ये शुक्रवारी लष्करी इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. हवाई दल प्रमुख व्ही आर चौधरी अपघातस्थळी दाखल झाले असून आसपासच्या परिसराची नाकाबंदी केली गेली असल्याचे समजते.

संरक्षण मंत्री राजनाथसिंग सकाळी ११ वा.१५ मिनिटाने लोकसभेत तर १२ वा. राज्यसभेत अपघाताची माहिती देणार आहेत. हेलिकॉप्टर दुर्घटनेची खबर मिळताच राष्ट्रपती आपला दौरा आटोपता घेऊन दिल्लीत परतले आहेत. राष्ट्रपती कोविंद, पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्यासह अनेक नेत्यांनी रावत यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी त्यांचा आज साजरा होणारा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय जाहीर केला असून रावत यांना श्रद्धांजली दिली आहे.

रावत यांनी १५ नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रातील नागपूर येथील एका कंपनीला दिलेली भेट त्यांची महाराष्ट्राची अखेरची भेट ठरली आहे. यावेळी रावत यांनी एका कंपनीने बनविलेल्या सशस्त्र ड्रोन हेक्साकॉप्टरचा प्रोटोटाईप, अन्य युद्ध सामग्री, दारुगोळा यांची पाहणी आणि माहिती घेतली होती. रावत यांच्या निधनाने देशात शोकसागर उसळला आहे. काश्मीर मधील दहशतवाद निपटून काढण्यात त्यांनी महत्वाची भूमिका बजावली होतीच पण चीनला डोक्लाम प्रकरणात झुकविण्यात त्यांची नीती यशस्वी ठरली होती. सैन्य सामग्री खरेदीला वेग देण्यात त्यांचे मोठे योगदान होते आणि त्यामुळेच शत्रूला त्वरित उत्तर देणे भारतीय सेनेला शक्य झाले होते.