लालूपुत्र तेजस्वी यादव चढले बोहल्यावर?

बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांचे धाकटे चिरंजीव, बिहारमधील विरोधी पक्ष नेते आणि राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांचा गुरुवारी दिल्ली मध्ये साखरपुडा आणि विवाह होत असल्याची बातमी आली आहे. लालू परिवारात पुन्हा एकदा शेहनाई वाजत असल्याचे तेजस्वी यांची बहिण रोहिणी आचार्य यांनी त्यांच्या अधिकृत ट्वीटर हँडलवर म्हटले आहे. सोशल मिडीयावर ही बातमी वेगाने व्हायरल झाली आहे.

आज म्हणजे गुरुवारी तेजस्वी यांचा साखरपुडा आणि विवाह त्यांची बहिण मिसा भारती यांच्या दिल्लीतील फार्म हाउसवर होत असून त्यासाठी लालू परिवारातील सदस्य आणि काही जवळचे नातेवाईक हजर झाले आहेत. हा कार्यक्रम अगदी खासगी स्वरुपात आणि ४० ते ५० लोकांच्या उपस्थितीत साजरा होत आहे. तेजस्वी यांच्या लग्नाची चर्चा बरेच दिवस होत होती मात्र त्यांनी २०२० मधल्या निवडणुका पार पडल्यावर आणि वडील लालू यांना जामीन मिळाल्यावर विवाहाचा विचार करेन असे सांगितले होते. बिहार मध्ये तेजस्वी मोस्ट फेव्हरीट बॅचलर ठरले होते.

लालू कुटुंबात सून म्हणून कोण येणार याची माहिती गुप्त ठेवली गेली होती. मात्र तेजस्वी यांची बालपणापासूनची मैत्रीण राजश्री हिच्यासोबत सात फेरे घेणार असल्याचे बोलले जात आहे. तेजस्वी नववी पास आहेत तर राजश्रीने बारावीनंतर उच्च शिक्षण घेतले आहे. या दोघांची ओळख शाळेपासूनची आहे. राजश्री यांचे कुटुंब काही काळ कोलकाता येथे होते मात्र आता ते दिल्लीत स्थायिक आहेत. तेजस्वी २०१५ ते १७ या काळात बिहारचे उपमुख्यमंत्री होते. त्यांनी आयपीएल मध्ये दिल्ली डेअरडेव्हिल्स कडून क्रिकेट खेळले आहे. झारखंड क्रिकेट टीममध्ये ते सहभागी होते. राधोपुर मधून ते आमदार म्हणून निवडून आले आहेत.

लालू प्रसाद यांना ७ मुली आणि दोन मुलगे आहेत. तेजस्वी धाकटे आहेत. त्यांचे मोठे भाऊ तेजप्रताप हेही आमदार आहेत.