रॉयल एन्फिल्डचा विक्रम- १२० सेकंदात विकल्या १२० बाइक्स

रॉयल एन्फिल्डने भारतात ६५० ट्वीन्स अॅनिव्हर्सरी एडिशनच्या १२० बाइक्स १२० सेकंदात विकून कंपनीने विक्रम केल्याची घोषणा केली आहे. इंटरसेक्टर ६५० व कॉन्टिनेन्टल जीटी ६५० एडिशन खास करून रॉयल एन्फिल्डच्या १२० व्या वर्धापनदिना निमित्त तयार केल्या गेल्या आहेत. या एडिशन मध्ये जगभरात विक्रीसाठी फक्त ४५० युनिट तयार केली असून त्यातील १२० भारतासाठी उपलब्ध केली गेली होती. भारतात जबरदस्त परफॉर्मन्स बाईक म्हणून रॉयल एन्फिल्डच्या बाईक ओळखल्या जातात.

१२० व्या वर्धापन दिनाचे निमित्त साधून लाँच केलेली ही एडिशन ६ डिसेंबर पासून ‘ प्रथम या, प्रथम घ्या’ योजनेवर उपलब्ध केली गेली होती. या मॉडेलला हँडक्राफ्ट डायकास्ट पितळी इंधन टँक बॅज आहे.बाईक अधिक आकर्षक बनविण्यासाठी हाताने पेंट पिनस्ट्रीप आहे. फ्युअल टँक टॉप बॅज एक युनिक सिरीयल नंबर सह दिला गेला असून साईड बॉडी पॅनलवर एक स्पेशल डीकल युनिक रिच ब्लॅक क्रोम इंधन टाकी आहे.

नोव्हेंबर १९०१ मध्ये लंडन येथे रॉयल एन्फिल्डची पहिली बाईक स्टेनली सायकल शो मध्ये सादर केली गेली होती. नव्या मॉडेल मध्ये इंजिन आणि अन्य स्पेसिफिकेशन कायम ठेवली गेली आहेत. नोव्हेंबर मध्ये कंपनीच्या विक्रीत २४ टक्के घट होऊन ४४८३० युनिट विकली गेली पण निर्यात वाढून त्यात ४५ टक्के वाढ झाली असे सांगितले जात आहे.