या नव्या लँडलाईन फोनवरून वापरता येणार फेसबुक, व्हॉटस अप

सध्या स्मार्टफोनचा जमाना आहे. काही वर्षापूर्वी जीवनावश्यक असलेला लँडलाईन फोन आता इतिहासजमा होऊ पाहतो आहे. हातात धरून हिंडताफिरता बोलणे, बँकेची कामे, सोशल मिडिया अॅप्सचा वापर करण्याची सुविधा स्मार्टफोन देत आहेत यामुळे लँडलाईनची उपयुक्तता आणखी कमी झाल्याचे दिसत आहे. मात्र सोशल मिडीयावरच लँडलाईनचा असा एक फोटो शेअर झाला आहे जो वेगाने व्हायरल झाला आहे.

फोटोत दिसत असलेल्या लँडलाईन फोनमध्ये मोबाईलचे सर्व फीचर्स आहेत. त्यावर फेसबुक, व्हॉटस अपचाही वापर करता येणार आहे. पूर्वी जेव्हा लँडलाईन फोन वापरात होते तेव्हा त्यांना डिस्प्ले नव्हताच. त्यानंतर या सेटमध्ये छोटा स्क्रीन आला ज्यावर डायल नंबर दिसू लागले. पण त्यानंतर आणखी काही सुधारणा होण्याआधीच मोबाईल आले आणि लँडलाईन फोन विस्मरणात जाऊ लागले. स्मार्टफोन स्क्रीनवर गेम्स खेळता येऊ लागल्यावर त्याची लोकप्रियता आणखी वेगाने वाढली. पण आता पुन्हा लँडलाईनचा ट्रेंड सुरु होण्याची शक्यता निर्माण झाल्याचे संकेत या फोटोवरून मिळत आहेत.

सुरवातीला फोनचे फोटो ही फेक न्यूज असावी असाच समज झाला होता. पण अधिक शोध घेता ही बातमी खरी आहे असे स्पष्ट झाले आहे. हा टॅब्लेट आणि रिसिव्हर असा कंबाइंड प्रोडक्ट असून त्यावर स्मार्टफोन मध्ये वापरता येणारी सर्व अॅप्स वापरता येतात. शिवाय तो लँडलाईन म्हणूनही वापरता येतो. या फोनला ‘केटीएस’ असे नाव दिले गेले असून या वायरलेस टॅब्लेट मध्ये सीम स्लॉट आहे आणि रिसिव्हर सुद्धा आहे. सर्वप्रथम या फोनचे फोटो जर्मनीच्या निकी टोन्सी यांनी ट्वीटरवर शेअर केला असून लोकांना हा फोन फारच आवडल्याचे प्रतिक्रियांवरून दिसून आले आहे.