नोव्हेंबर मध्ये  चलनात २ हजाराच्या नोटांची संख्या घटली

या वर्षी चार नोव्हेंबर रोजी घेण्यात आलेल्या आढाव्यात चलनातील २ हजार रुपये मूल्यांच्या नोटांची संख्या कमी होऊन २२३.३ कोटींवर आल्याचे सांगितले गेले आहे. मार्च २०१८ मध्ये २००० रुपये मूल्याच्या ३३६.३ कोटी नोटा चलनात होत्या. एकूण चलनी नोटांच्या तुलनेत २ हजार रुपये मूल्याच्या १.७५ टक्के नोटा चलनात आहेत. वित्त राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी राज्यसभेत विचारल्या गेलेल्या एका प्रश्नाला लिखित स्वरुपात उत्तर देताना ही माहिती दिली आहे.

चौधरी म्हणाले नोटा छपाईचा निर्णय रिझर्व्ह बँकेबरोबर विचार विनिमय करून घेतला जात असतो. ३१ मार्च २०१८ मध्ये २००० रूपये मूल्याच्या ३३६.३ कोटी नोटा होत्या ती संख्या कमी होऊन २६ नोव्हेंबर २०२१ मध्ये २२३.३ कोटींवर आली आहे. नोटबंदीच्या निर्णयानंतर २००० रुपये मूल्याच्या नोटा चलनात आणल्या गेल्या पण एप्रिल २०१९ पासून या नोटांची छपाई केली गेलेली नाही. काही नोटा फाटल्याने, जीर्ण झाल्याने बाद झाल्या आहेत.

याच वर्षी मार्च मध्ये सरकारने काळा पैसा चलनात येऊ नये यासाठी आणि लोकांनी साठवणूक करू नये यासाठी दोन हजारांच्या नोटा न छापण्याचा निर्णय घेतला असल्याचे काही सूत्रांकडून सांगितले जात आहे.